नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दिवाळीच्या निमित्ताने उडविलेल्या फटाक्यांनी शहरातील 27 ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या असून, या सर्व आगींवर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून सर्व आगी आटोक्यात आणल्या.
यामध्ये पंचवटीतील हिरावाडी रोडवरील भिकुसा मिल आणि मुंबई नाका परिसरात असलेल्या वझरे मळा या दोन ठिकाणी मोठ्या आगी लागल्याच्या घटना घडल्या, तर सिडको आणि म्हाडा वसाहतीमध्ये घरामध्ये ठेवलेल्या भंगाराला आग लागल्याची घटना घडली आहे.
काल लक्ष्मीपूजन निमित्ताने मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या आतषबाजीमुळे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये पंचवटीतील हिरावाडी रोडवर असलेल्या भिकुसा मिल या ठिकाणी पेटती वस्तू पडल्यामुळे आग लागल्याची घटना घडली. तातडीने अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर के. के. वाघ आणि नाशिकरोड व मुख्यालयातील अग्निशमन दलाच्या बंबांनी या ठिकाणी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांनी दहा फेर्या पूर्ण केल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले, तर दुसरी घटना मुंबई नाका परिसरात असलेल्या वझरे मळा या ठिकाणी उभे असलेल्या भंगारमधील गाड्यांवर पेटती वस्तू पडल्यामुळे लागलेल्या आगीतून झाली. याही ठिकाणी माहिती मिळाल्यानंतर मुख्यालयातील अग्निशमन दलाच्या बंबांनी तातडीने धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. या ठिकाणी भंगारमध्ये ठेवण्यात आलेल्या काही गाड्यांचे नुकसान देखील झाले आहे.
याशिवाय सिडको परिसरात एका घराबाहेर ठेवण्यात आलेल्या पुठ्ठे आणि भंगारमधील वस्तूंवर ज्वलनशील वस्तू पडल्यामुळे आग लागली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सिडको विभागाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी या ठिकाणी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. तर वडाळा गाव परिसरात म्हाडा कॉलनीमध्ये असलेल्या घराच्या गॅलरीमध्ये ठेवलेल्या पुठ्ठ्यांना आग लागल्याची घटना घडली. तातडीने ही आग विझविण्यात आली. तर के. के. वाघ या परिसरामध्ये चायनिज गाडीवर ज्वलनशील वस्तू पडल्यामुळे आग लागल्याची घटना घडली होती. याशिवाय नाशिक शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी ज्वलनशील वस्तू पडल्यामुळे झाड, कचरा आणि गवताला आग लागल्याच्या घटना घडल्या. या घटना गेट वे हॉटेल शेजारी, कोणार्कनगर आडगाव नाका, चुंचाळे, विडी कामगारनगर, के. के. वाघ, नाशिकरोड परिसरातील शिवशक्तीनगर यासह विविध भागांमध्ये या घटना घडल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. सुमारे 27 ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी जाऊन आग नियंत्रणात आणली.