येवला :- लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या एका धडक कारवाईत, येवला तालुक्यातील चिचोंडी येथील एका तलाठीला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या सात-बारा उताऱ्यावर आवश्यक नोंद करण्यासाठी चिचोंडीचा तलाठी राहुल रिंढे याने सुरुवातीला २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती १५०० रुपयांची लाच घेण्याचे ठरले. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.
या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिकचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने सापळा रचला.
आज चिचोंडी येथील कार्यालयातच तक्रारदाराकडून १५०० रुपयांची लाच स्वीकारत असताना तलाठी राहुल रिंढे याला पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.