दुष्काळाच्या सावटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार विभागातील अनेक तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती चिंतेचा विषय : कृषिमंत्री दत्ता भरणे
दुष्काळाच्या सावटात शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार विभागातील अनेक तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती चिंतेचा विषय : कृषिमंत्री दत्ता भरणे
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : नाशिक विभागातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळाचे सावट असून ही परिस्थिती चिंतेचा विषय आहे. शेतकऱ्यांची अवस्था गंभीर असून नैसर्गिक संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी केले.

नाशिक विभागाची दुष्काळ आढावा बैठक कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, कृषी आयुक्त सुरज मांढरे, विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे पालकमंत्री, आमदार, खासदार आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमधील ५४ तालुक्यांचा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने केलेले नियोजन, पिकांची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणी यावर लोकप्रतिनिधींनी विविध मुद्दे मांडले. अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली.
एल निनोच्या संकटाचा राज्याला फटका बसला असून अनेक भागांत पिके जळाली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल, याचे नियोजन सुरू असल्याचे भरणे यांनी सांगितले.

यावेळी विजेच्या तारांच्या चोरीचा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेच्या तारांची चोरी होत असल्याचा मुद्दा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडला. याबाबत नाशिकचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन येत्या दोन-तीन दिवसांत बैठक घेणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली आहे. हा पाहणी दौरा शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष जाणे शक्य नसले तरी शेतकऱ्यांच्या अडचणींची सरकारला जाणीव आहे. ‘आम्ही देखील शेतकऱ्यांची मुलं आहोत,’ असे सांगत नैसर्गिक संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पहिली दुष्काळ अधिसूचना काढण्याचे सांगितले असून, यावेळी दुष्काळ जाहीर करण्यासाठी मागील वेळेस लागलेला वेळ लागणार नाही, असेही भरणे यांनी सांगितले. पीक विमा आणि एनडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार असून पीक विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळाच्या प्रश्नावर राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group