नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- टीसीएस कंपनीतील महिला कर्मचार्यांचा लैंगिक छळ, धर्मांतर आणि इतर आरोप असलेली कर्मचारी निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना नाशिक न्यायालयाने जामीन मंजूर आहे. यावेळी न्यायालयात जलील यांच्या वकिलांनी ते सर्व तपासात सहकार्य करीत असल्याचे सांगितले.
बहुराष्ट्रीय कंपनी टीसीएसच्या नाशिक शाखेतील महिला कर्मचार्यांचा लैंगिक छळ व धार्मिक भावना दुखावणे आणि धर्मांतराचा प्रयत्न करणे, असे आरोप असलेल्या संशयित आरोपी निदा खान व इतर सहकार्यांविरुद्ध मुंबई नाका व नाशिकरोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या एसआयटीने फरारी असलेली निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती.
या प्रकरणामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यासह इम्तियाज जलील यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या सर्व प्रकरणामध्ये नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये पोलिसांनी चार्जशिट दाखल केले असून, न्यायालयाने एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी असल्याने उपस्थित राहण्यास सांगितले होते.
सहआरोपी असलेले माजी खा. जलील आज नाशिक न्यायालयात दाखल झाले. यावेळी न्यायालयात सरकारी पक्ष आणि सहआरोपी असलेले जलील यांच्या वकिलांचा सुमारे अर्धा तास युक्तिवाद झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने जलील यांची 50 हजार रुपयांच्या जात मुचालक्यावर जामीण मंजूर केला.