मोठी बातमी!  नाशिकसह  राज्यातील सहा महानगरांत शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे
मोठी बातमी! नाशिकसह राज्यातील सहा महानगरांत शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणे
img
Nandini khandare More
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकसह राज्यातील सहा महानगरपालिकांसाठी शासनाने शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली असून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी संबंधित मनपा आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरी भागामध्ये घडणार्‍या दुर्घटनानंतर तातडीने मदत आणि पुनर्वसनाची कामे वेगाने व्हावीत, यासाठी म्हणून राज्याच्या आपत्ती आणि मदत पुनर्वसन विभागाच्या वतीने नवीन प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शासनाची अधिसूचना दि. 5 ऑक्टोबर रोजी या विभागाच्या अप्पर सचिव विनिता वेद-सिंगल यांच्या स्वाक्षरीने राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाली असून, या विभागाच्या अधिसूचनेमध्ये दिलेल्या माहितीनुसार नाशिक महानगरपालिकेसह नागपूर, नवी मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड, ठाणे आणि वसई-विरार या महानगरपालिकांसाठी शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे

या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी पदसिद्ध म्हणून संबंधित महानगरपालिकेचे आयुक्त असतील, तर जिल्हाधिकारी हे उपाध्यक्ष असतील. सदस्यांमध्ये त्या परिसरातील पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षक, अग्निशमन विभागाचे अधिकारी, प्रादेशिक विकास प्राधिकरण प्रमुख, शहर अभियंता (विद्युत विभाग), शहर अभियंता (जल आणि स्वच्छता विभाग), वैद्यकीय अधिकारी आणि त्या महानगरपालिकेमध्ये असलेले आपत्ती विभागाचे अतिरिक्तआयुक्त किंवा उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरी भागामध्ये आता कोणतीही आपत्ती ओढवली, तर तातडीने मदत कार्य आणि त्याबाबतचे निर्णय घेतले जाणार आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group