नाशिक मधून एक थरारक हत्येची घटना घडली आहे. टकलेनगर परिसरात आज (शुक्रवार दि. २०) रोजी भरदुपारी एका महाविद्यालयीन युवकाची हत्या करण्यात आली. वेदांत संतोष काळे (१८) असे मृत युवकाचे नाव असून, तो पंचवटी महाविद्यालयात १२ वी मध्ये शिक्षण घेत होता. टकलेनगर येथील वैशाली अपार्टमेंट जवळील जिजामाता महिला व्यायामशाळेच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, मुलीवरून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. सुमारे ६ ते ८ जण दुचाकींवरून घटनास्थळी आल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी काहींनी वेदांतवर धारधार शस्त्राने सपासप वार केले. यात त्याच्या छाती व पाठीवर खोलवर जखमा झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. हल्ल्यानंतर संशयितांनी घटनास्थाळाहून पळ काढला.
घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या वेदांतला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान, या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.