अलीकडे गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून आता हत्येसारखे गुन्हे सर्रास पाने घडत आहेत. आणि काही गुन्हे तर अत्यंत धक्कादायक आणि चक्रावून सोडणारे असतात की कोणी विचार सुद्धा करणार नाही. बंगळूरूमध्ये एका कॅब चालकाने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीसह तिच्या कुटुंबातील 7 सदस्यांची हत्या केली. तो सासरच्या मंडळींवर नाराज होता आणि त्याने काही दिवसांच्या अंतरावरती सर्वांना संपवले, असा आरोप आहे. या घटनेने नागरिक हादरून गेले आहेत. मृतांमध्ये 7 वर्षांच्या लहान मुलाचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत हे खून झाले असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
कौटुंबिक वादातून एका कॅबचालकाने पत्नी, सासू, दोन मेहुणे, त्यांच्या पत्नी आणि 7 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळूरूमधून उघडकीस आली आहे. इंदुशेखर उर्फ शेखर असे आरोपीचे नाव असून, गेल्या 15 ते 20 दिवसांत या हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. आरोपीने स्वतःच्या घरात या हत्या केल्या आणि मृतदेह कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, दिलेल्या माहितीच्या आधारे मृतदेहांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत 7 वर्षाच्या पुनीतचा मृतदेह नंदी हिल्स परिसरातून सापडला आहे
आरोपीने मेहुण्याच्या 11 वर्षाच्या मुलाचीही हत्या करण्याचे नियोजन केले होते. मात्र, तो मुलगा बचावला.आरोपीने त्याला विमानतळ, सुब्रह्मण्य मंदिर, धर्मस्थळ आणि शृंगेरी येथे नेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. प्रवासादरम्यान आरोपी गाडीतून काही पिशव्या फेकत असल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने पत्नी सुनीताची हत्या केल्यानंतर तिचा मोबाईल बंद केला आणि ती सहलीला गेल्याचे शेजाऱ्यांना सांगितले. मृतांच्या मोबाईल फोनवरून त्यांच्या नातेवाईकांना संदेश पाठवून ते देशभरात फिरायला गेल्याचे भासवले. मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार आणि हत्येसाठी वापरल्याचा संशय असलेली दगडी पाटा-वरवंट्यासारखी वस्तू पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपीने आपल्या मुलीला मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करण्यास भाग पाडल्याचा संशय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख इंदुशेखर उर्फ शेखर अशी पटली असून, त्याने राजाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वतःच्या घरात या हत्येचे कृत्य केले आणि मृतदेहांची कर्नाटकातील वेगवेगळ्या ठिकाणी विल्हेवाट लावली. आरोपीला पोलीस कोठडीत घेऊन कसून चौकशी केली जात असून, त्याने मृतदेह कुठकुठे फेकून दिले आहेत, याबाबतची माहिती पोलीस गोळा करत आहेत. नंदी हिल्सच्या आसपास शोधमोहीम राबवून पोलिसांनी 7 वर्षांच्या मुलाचा मृतदेह जप्त केला आहे, तर उर्वरित 6 मृतदेहांचा शोध अद्याप सुरू आहे.
बंगळूरूचे पोलीस आयुक्त सीमंत कुमार सिंह यांनी सांगितले की, 3 नोव्हेंबर रोजी श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली की, त्यानंतर तपासादरम्यान या कथित हत्यांचा पर्दाफाश झाला. त्यानंतर राजाजीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनुसार, मृतांची नावे आरोपीची पत्नी सुनीता, सासू रूपावती, साले शिवकुमार व शंकर, शिवकुमारची पत्नी दिव्या, शंकरची पत्नी नलिनी आणि शिवकुमार व दिव्या यांचा 7 वर्षांचा मुलगा पुनीत अशी आहेत.
पोलिसांनी सांगितले की, यानंतर त्याने सुनीताचा मोबाईल फोन बंद करून टाकला आणि ती फिरण्यासाठी गेली असल्याचे शेजाऱ्यांना सांगितले, जेणेकरून कोणालाही त्याच्यावर संशय येऊ नये. दुसऱ्या दिवशी त्याने शिवकुमार आणि शंकर यांना पार्टीच्या बहाण्याने घरी बोलावून त्यांची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. यानंतर त्याने दिव्या, नलिनी, रूपावती आणि पुनीत यांचीही हत्या केली. नलिनीच्या आईने 3 नोव्हेंबर रोजी श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या कथित हत्या उघडकीस आल्या. तपासादरम्यान पोलिसांना या एकापाठोपाठ एक झालेल्या हत्यांची माहिती मिळाली, त्यानंतर आरोपी शेखरला अटक करण्यात आली.
हत्येनंतर घरातील स्वच्छता करण्यासाठी आणि रक्ताचे डाग पुसून टाकण्यासाठी आरोपीने रसायनांचा (केमिकल्स) वापर केल्याचेही पोलिसांनी सांगितले. मृतदेह नेण्यासाठी वापरलेली कार आणि हत्येसाठी वापरलेली दगडी पाटा-वरवंट्यासारखी वस्तू पोलिसांनी जप्त केली आहे. मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने आपल्या मुलीलाही भूलथापा देऊन सोबत घेतल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलीचे वय अंदाजे 17 किंवा 18 वर्षे असून या प्रकरणातील तिच्या कथित सहभागाचीही चौकशी सुरू आहे.