उत्तराखंडमधून एक अत्यंत दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. बद्रीनाथ धामहून ऋषिकेशच्या दिशेने निघालेलं हेलिकॉप्टर जोशीमठजवळ भीषण अपघातात कोसळलं. बद्रीनाथ धाम येथून सहा प्रवाशांना घेऊन ऋषिकेशकडे जाणारे ट्रान्स कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले. चांई आणि थैंग गावांच्या परिसरात खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमधील सहाही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचे लोकेशन मिळत नसल्याचा निरोप मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली असून घटनास्थळाच्या दिशेने तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन (शोध आणि बचाव मोहीम) सुरू करण्यात आले आहे.
संबंधित हेलिकॉप्टर कंपनी आणि प्रशासन संयुक्तपणे हेलिकॉप्टरचे लोकेशन शोधण्याचे प्रयत्न करत आहेत. भारतीय लष्कराकडून घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने अपघाताचे ठिकाण शोधून हेलिकॉप्टर कोसळल्याची पुष्टी केली, अशी माहिती चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी दिली आहे. मात्र, सहा जणांच्या मृत्यूबाबतची अंतिम अधिकृत पुष्टी आणि अपघाताचे नेमके कारण याबाबत अधिकृत तपशीलांची प्रतीक्षा आहे.