राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे.त्यामुळे या निवडणुकीत कोणाला संधी मिळणार आणि कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून १ नोव्हेंबरला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. डॉ. एल. मुरुगन यांचा कार्यकाळ २ एप्रिल २०३० पर्यंत होता. पण त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदासोबत मध्य प्रदेशातील राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला होता.
राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक - - २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना जारी करण्यात आली - २ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख - ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अर्जांची छाननी केली जाणार - ५ नोव्हेंबर २०२६ रोजी उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख - १२ नोव्हेंबर २०२६ रोजी मतदान आणि मतमोजणी - सकाळी ९ ते दुपारी ४ वाजतेपर्यंत मतदान होणार आहे - त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजता मतमोजणी होऊन निकाल लागणार
माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी १३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी तळागाळातील राजकारणात परतण्याची इच्छा व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते. हे पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते. या पत्राद्वारे त्यांनी पीएम मोदींना विनंती केली होती की, 'अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञतेने मी आपणास विनंती करतो की, मला राज्यमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्यांमधून कार्यमुक्त करावे आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची परवानगी द्यावी. जेणेकरून मी माझा संपूर्ण वेळ तामिळनाडूमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी देऊ शकेल.' असे मुरुगन यांनी पत्रात लिहिले होते.
त्यांनी पुढे असे सांगितले होते की, 'मला प्रत्येक गावात आणि प्रत्येक गल्लीत जायचे आहे, माझ्या लोकांना भेटायचे आहे. माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाची उपस्थिती वाढवण्यासाठी मदत करायची आहे.' तसंच, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतमातेची आणि तामिळनाडूची सेवा करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे.', असे मत त्यांनी व्यक्त केले होते.