नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू असतानाच लोकप्रतिनिधींशी संबंधित एक रंजक माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत नागपूर विभागातील १४ आमदार आणि २ खासदारांना मतदान करता येणार नाही.धक्कादायक म्हणजे लोकप्रतिनिधींच्या हातात जिल्ह्याच्या राजकारणाची दोरी आहे, तेच स्वतः या निवडणुकीत मतदार नाहीत.
मतदानाचा अधिकार का नाही?
पदवीधर मतदारसंघाच्या नियमानुसार, मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संबंधित व्यक्ती पदवीधर असणे अनिवार्य असते. पण नागपूर विभागातील ३२ पैकी १४ आमदारांचे शिक्षण पदवीपेक्षा कमी (दहावी, बारावी किंवा कॉलेजचे पहिले-दुसरे वर्ष) असल्यामुळे त्यांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क मिळालेला नाही.
कोणते बडे नेते यादीत? या मतदानापासून वंचित राहणाऱ्यांमध्ये भाजपचे दिग्गज नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार, आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांसारख्या बड्या दिग्गजांचा समावेश आहे. केवळ आमदारच नाही, तर रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि राज्यसभेच्या खासदार माया इवनाते हेसुद्धा पदवीधर नसल्याने मतदार बनू शकलेले नाहीत.
कोण मतदान करू शकणार नाही? त्यांचं शिक्षण काय? नागपूर जिल्हा :
कृष्णा खोपडे (७ वी), चरणसिंह ठाकूर (१२ वी), मोहन मते (ITI), प्रवीण दटके (डिप्लोमा Ist Year), चंद्रशेखर बावनकुळे (B.Sc Ist Year). चंद्रपूर जिल्हा: विजय वडेट्टीवार (१० वी), किशोर जोरगेवार (१० वी). भंडारा जिल्हा: राजू कारेमोरे (१२ वी), नाना पटोले (B.A. IInd Year). गोंदिया जिल्हा: विनोद अग्रवाल (१२ वी), संजय पुराम (१२ वी). गडचिरोली जिल्हा: धर्मरावबाबा आत्राम (१० वी). वर्धा जिल्हा: समीर कुणावार (१२ वी), राजेश बकाने (B.A. Ist Year). खासदार: माया इवनाते (५ वी), श्यामकुमार बर्वे (B.A. IInd Year).