नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिक परिसरातील विविध हॉटेल्समधील अस्वच्छता व इतर कारणांवरून अन्न व औषध प्रशासनाच्या धाडी सुरूच आहेत.
या धाडींमध्ये प्रसिद्ध पेरूची वाडी या पर्यटन व मिसळसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेलमधून 33 हजार रुपये किमतीची 110 किलो शेव जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर जुन्या मध्यवर्ती बस स्टॅण्डजवळील हॉटेल यात्री आणि हॉटेल जनता यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर मखमलाबाद शिवारातील फिजी फॉक्स येथील हॉटेलमध्ये अस्वच्छ परिस्थिती, अन्न तयार करण्याच्या ठिकाणी कीटक व इतर उपद्रवी जिवांचा प्रादुर्भाव, अनुसूची-4 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे, तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ मिळून आले. त्यामुळे येथील हॉटेलचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सीबीएसजवळील हॉटेल यात्रीमध्ये अन्न आस्थापनांत अस्वच्छ परिस्थिती, अन्न सुरक्षा व मानके अनुसूची-4 मधील तरतुदींचे उल्लंघन व आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असल्याने त्यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. याच परिसरातील हॉटेल जनतामध्ये अन्न आस्थापनांमध्ये अस्वच्छ परिस्थिती, तसेच अनुसूची-4 मधील तरतुदींचे उल्लंघन व तयार अन्नपदार्थ उघड्यावर विक्रीसाठी तयार ठेवल्याचे आढळून आले.
मुंगसरे येथील परिसरातील पेरूची वाडी या हॉटेलमध्ये तपासणीमध्ये शेव या पदार्थाचा दर्जा निकृष्ट आढळला. त्यामुळे 33 हजार रुपये किलो किमतीची 110 किलो शेव जप्त करण्यात आली व आढळून आलेले दोष नाहीसे करून सुधारणा करण्यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली.
या कारवाया अन्न सुरक्षा अधिकारी गोविंदा गायकवाड, अश्विनी पाटील, ऋतुजा नवले, प्रतीक भड यांनी केल्या आहेत.
ही मोहीम यापुढेही चालू राहणार असून, आवश्यक ती स्वच्छता व अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदींचे योग्य ते पालन करूनच अन्न व्यावसायिकांनी व्यवसाय करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.