एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून, या दुर्घटनेत १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी व्हॅन तब्बल ७०० मीटर खोल दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा भीषण अपघात नेपाळमध्ये घडला आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरलेली एक गाडी ७०० मीटर खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली. १० सीटर असलेल्या वाहनात १५ जणांना कोंबून भरण्यात आले होते, त्यामुळे वाहनाचा तोल गेल्याचे बोलले जात आहे. या अपघातामुळे घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नेपाळमधील मकवानपूर जिल्ह्यात अपघाताची दुर्दैवी घटना घडली. काठमांडूहून हेतौंडाला प्रवाशांना घेऊन जाणारी एक ईव्ही हाय-व्ही व्हॅन दरीत कोसळल्यामुळे दुर्घटना घडली. या अपघातात चालकासह १४ जणांचा मृत्यू झाला. भीमफेडी गाव नगरपालिका-६ मधील चिसापानिगढी येथे हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळावर स्थानिकांनी धाव घेतली, पोलिसांनीही तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ईव्ही हाय-व्ही व्हॅन गुरुवारी सकाळी सर्लाही जिल्ह्यातून काठमांडूला प्रवाशांना घेऊन जात होती. भीमफेडी-कुलेखानी-काठमांडू रस्त्यावर चिसापानिगढीजवळ वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि खोल दरीत कोसळले. मृतांमध्ये तीन महिला, दोन मुली आणि पाच पुरुषांचा समावेश आहे. १० जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस सध्या मृतांची ओळख पटवण्याच्या प्रक्रियेत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, फक्त १० लोकांची क्षमता असलेल्या ईव्हीमध्ये चालकासह एकूण १५ लोक प्रवास करत होते. मृत आणि जखमी हे सर्लाही जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमींमध्ये ३३ वर्षीय मुकेश यादव, ५ वर्षीय सक्षम कुमार यादव आणि ३ वर्षीय सुदान यादव यांचा समावेश आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुकेश आणि सक्षम यांची प्रकृती स्थिर आहे. सुदानची प्रकृतीत सुधारणा आहे. सर्व जखमींवर हेतौंडा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच, नेपाळ पोलीस, सशस्त्र पोलीस दल, नेपाळ सैन्य आणि बागमती प्रदेश आपत्ती व्यवस्थापन गटाची पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी संयुक्तपणे मदत आणि बचाव कार्य सुरू केले. मकवानपूर जिल्हा पोलीस कार्यालयाचे एसपी श्याम बहादूर खत्री यांच्या नेतृत्वाखालील एक पोलीस पथकही घटनास्थळी दाखल झाले.