समृद्धी महामार्गावर वाहनांचा विचित्र अपघात; एकापाठोपाठ एक गाड्या आदळल्या
समृद्धी महामार्गावर वाहनांचा विचित्र अपघात; एकापाठोपाठ एक गाड्या आदळल्या
img
Nandini khandare More
समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून, तब्बल ८ ते १० वाहने एकमेकांवर आदळल्याची माहिती समोर आली आहे. अचानक झालेल्या या साखळी धडकेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. अनेक वाहनांचे नुकसान झाले असून, अपघातामुळे वाहतुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. हा अपघात नेमका कसा घडला? यामध्ये किती जण जखमी झाले? अपघाताचे कारण काय? जाणून घ्या सविस्तर...

समोर आलेल्या माहितीनुसार,  दुसरबीडजवळ अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने मोठी दुर्घटना झाली. या अपघातात सुमारे ८ ते १० वाहनांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून एक ट्रक जात असताना त्याने समोर असलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर मागून येणाऱ्या वाहनांच्या चालकांना अचानक ब्रेक लावण्याची वेळ आली. मात्र, वाहनांचा वेग जास्त असल्याने अनेक गाड्यांवर चालकांचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे एकामागून एक वाहने एकमेकांवर धडकली. अशा प्रकारे महामार्गावर वाहनांची मोठी साखळी तयार झाली आणि हा अपघात घडला.

या दुर्घटनेत अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही गाड्यांचे पत्रे पूर्णपणे दबले असून काही वाहने एकमेकांवर चढल्याचेही दिसून आले. अपघाताची दृश्ये पाहता धडक किती जोरदार होती, याचा अंदाज येतो. मात्र, या मोठ्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात अडकलेली वाहने बाजूला करण्याचे आणि महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे काही काळ या मार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. दरम्यान ही दिवसभरातील दुसरी घटना असून आज सकाळच्या सुमारास कोस्टल रोडवर ६ वाहनांचा विचित्र अपघात झालेला पाहायला मिळाला.या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group