कन्नड सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते हरीश याचं एका रस्ते अपघातात निधन झालंय. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी अभिनेत्यावर काळानं घाला घातलाय. त्यामुळे सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होतेय. कोडगू जिल्ह्यातील कुशालनगर तालुक्यात घडलेल्या एका भीषण रस्ते अपघातात अभिनेत्यावर काळानं घाला घातला. हरीशने आपल्या असाधारण अभिनय कौशल्याच्या जोरावर कन्नड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये स्वतःचं वेगळे स्थान निर्माण केलंय.
मीडिया रिपोर्टनुसार, 40 वर्षीय हरीश रात्री उशिरा आपली कामं आटोपून कुशालनगरहून होस्कोटे इथल्या आपल्या घराच्या दिशेनं कार चालवत निघाला होता. या प्रवासादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग 275 वरील एका वनक्षेत्राजवळ, त्याच्या कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टँकरला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, अभिनेत्याच्या कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
अभिनेत्याच्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरला कारची धडक कशी बसली? याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपट कलाकार रस्ते अपघातांचे बळी ठरले आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूनं पुन्हा एकदा रस्ते सुरक्षाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अभिनेत्याच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमुळे कन्नड सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. हरिश केवळ 40 वर्षांचा होता आणि आता कुठे तो इंडस्ट्रीत नावारुपाला आला होता. त्यानं आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय. विशेषतः 'खलनायकी' भूमिका साकारण्याच्या त्यांच्या शैलीचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलेलं. इतक्या कमी वयात आणि अशा दुर्दैवी पद्धतीने एका अत्यंत गुणी अभिनेत्याच्या जाण्यानं कन्नड इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झालीय.