धुळवड खेळायला मित्रांसोबत गेला अन् रक्तानेच...;  २२ वर्षांच्या कृष्णासोबत नेमकं काय घडलं ?
धुळवड खेळायला मित्रांसोबत गेला अन् रक्तानेच...; २२ वर्षांच्या कृष्णासोबत नेमकं काय घडलं ?
img
वैष्णवी सांगळे
बीडमधून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. भीषण अपघाताच्या दुःखद घटनेने होळीच्या सणाच्या दिवशी बीड शहरावर शोककळा पसरली आहे. धुलिवंदन साजरा करण्यासाठी मित्रांसोबत रिसॉर्टवर जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाचा प्रवासातच करुण अंत झाला. बीड-शिरूर रोडवरील नागऱ्याचीवाडी येथे सोमवार, 2 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास भरधाव कारचा भीषण अपघात झाला. 

या अपघातात कृष्णा जालिंदर मुळे (वय- 22 वर्षे) हा तरुण जागीच ठार झाला असून, त्याचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.बीडमधील रामतीर्थ परिसरात राहणारा २२ वर्षांचा कृष्णा जालिंदर मुळे आपल्या मित्रांसोबत "होळी अन् धुलिवंदन करून येतो" असं सांगून घरातून निघाला. मात्र काळाने रस्त्यातच त्याच्यावर घाला घातला.  

कृष्णा आणि त्याचे मित्र दोन गाड्यांतून मोठ्या उत्साहात एका रिसॉर्टकडे निघाले होते. तरुण वय, सोबतीला जिवाभावाचे मित्र आणि सणाचा उत्साह पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. शिरूर रोडवर नागऱ्याचीवाडीजवळ भरधाव कारवरचं नियंत्रण सुटलं आणि ती कार रस्त्यावर ४ वेळा उलटली. गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. गाडीत बसलेल्या कृष्णाला सावरण्याची संधीही मिळाली नाही. ज्या हातांनी धुलिवंदन खेळायचं होते, ते हात रक्ताने माखले आणि कृष्णाचा मृतदेह रक्तबंबाळ होऊन पडला.

कार उलटत जाऊन थेट शेतातील एका विहिरीच्या कठड्याला धडकली. जर तो कठडा नसता, तर कार थेट विहिरीत कोसळली असती आणि इतर मित्रांचाही जीव वाचवणं कठीण झालं असतं. मागून येणाऱ्या थारमधील मित्रांनी धावत जाऊन आपल्या रक्ताळलेल्या मित्रांना बाहेर काढलं, पण कृष्णाची हालचाल तोवर थांबली होती. आपल्या लाडक्या मित्राचा मृतदेह हातात घेताना त्या तरुणांच्या डोळ्यात पाणी होतं.

"पोरा, लवकर येतो म्हणाला होतास, असा अर्ध्यावर सोडून का गेलास?" असा टाहो आईनं फोडला आहे. या अपघातात प्रसाद खोले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर संभाजीनगरमध्ये उपचार सुरू आहेत, तर यश पेंढारे आणि दुसरा एक मित्र बीडमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. संपूर्ण जिल्हा आज या तरुणांसाठी प्रार्थना करत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group