नाशिक जिल्ह्यातील भाविकांच्या बसला कानपूर (उत्तर प्रदेश) जवळ आज पहाटे अपघात झाला. या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला असून वाहनचालक गंभीर जखमी आहेत. तर काही भाविक किरकोळ जखमी असून त्यांच्यावर कानपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कानपूर येथील प्रशासनाशी संपर्क साधत भाविकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची विनंती केली.
नाशिक जिल्ह्यातील ओझर, पिंपळगाव, मालेगाव परिसरातील सुमारे 50 भाविक उत्तर भारतात तीर्थयात्रेसाठी खासगी यात्रा बसने गुरूवारी निघाले होते. त्यांच्या बसला आज पहाटे कानपूर जवळ अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी कानपूर जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधला. त्यानंतर जखमींना कानपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी अपर जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. जिल्हा प्रशासन जखमींच्या संपर्कात असल्याचे कानपूर येथील अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी दिली.
दरम्यान, निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनीही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच कानपूर येथील प्रशासनाशी संपर्क साधत जखमींची विचारपूर करून त्यांचेवर आवश्यक ते वैद्यकीय उपचार त्वरीत मिळण्याबाबत सूचित केले आहेत.