सुट्टीवरून परतताना मित्रांवर काळाने घाला घेतला असल्याची धक्कादायक घटना आंबेनळी घाटातून समोर येत आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून गाडी खोल दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पोलादपूर दरम्यानच्या आंबेनळी घाटात हा भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ 1000 फूट खोल दरीत कोसळून 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या आठही तरुण साताऱ्याचे होते. साताऱ्याला जात असताना त्यांच्यावर काळाचा घाला झाला
कोकणच्या सफरीवरून परत येणाऱ्या पर्यटकांना घेऊन जाणारी स्कॉर्पिओ जीप अचानक अनियंत्रित झाली आणि खोल दरीत कोसळली. या अत्यंत भीषण अपघातात 8 तरूणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताचाी माहिती मिळताच बचाव आणि मदत पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. दुर्बीणीच्या मदतीने मृतदेहांचा शोध घेतला जात होता.
प्राथमिक अहवालानुसार, हा भीषण अपघात रविवार आणि सोमवारी पहाटे 2:45 च्या सुमारास दाबेली गावाजवळ घडला. अपघातात सामील असलेली स्कॉर्पिओ जीप सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातल्या आसगाव येथील असल्याचे समजते. कोकणात सुट्टी घालवून काही मित्र घरी परत जात होते. मात्र पहाटेच्या वेळी ते आंबेनळी घाटाजवळ पोहोचले असतानाच अचानक चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही जीप फूट खोल दरीत कोसळली.या अपघातामुळे मोठी शोककळा पसरली.
या भीषण घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस प्रशासन, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड बचाव पथक, सिस्केप महाड, आपडा मित्र आणि स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. ही दरी प्रचंड खोल असल्यामुळे आणि तो भाग दुर्गम असल्यामुळे बचाव पथकांतील कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मृतदेह शोधण्यासाठी दुर्बिणींचा वापर केला जात आहे. ही गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे मृत प्रवाशांचे मृतदेह वर आणण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत दोन मृतदेह सापडले असून, उर्वरित 6 जणांचा शोध घेण्यासाठी मोठी बचाव मोहीम सुरू आहे. दोघांचे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका पोलादपूरमधील सरकारी रुग्णालयात गेली आहे.