सध्या राज्यात पावसाने हाहाकार मजनवला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यंना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. दरम्यान आता पुण्यातील मावळ तालुक्यातील पाठण गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.
पुण्यातील मावळ तालुक्यातील पाठण गावात दुर्दैवी घटना घडलीये. अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याचा एक भाग कोसळून या गावातील एक कुटुंब गाडलं गेलंय. नंदू तिकोणेंच्या कुटुंबावर काळरात्र चालून आलीये. नंदू तिकोने, पत्नी आणि मुलगा घरात असताना काळानं घाला घातला. या तिघांचा शोध सुरू असून एनडीआरएफ पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंतएकाचा मृतदेह सापडला आहे.
मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (6 जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO), पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आलं.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील 5व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली 30 सदस्यांचे (1 अधिकारी, 2 वरिष्ठ अधिकारी आणि 27 जवान) पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी 5.50 वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.
नेमकं घडलं काय?
अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या पाठण गावात दुर्घटना घडली. नंदू तिकोणेंचं घर किल्ल्यावरुन ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं. पहाटे 4 वाजता त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अक्षय भोसलेनं तिकोणेंचं घर पाहिलं, मात्र पुढच्या पाच मिनिटांत स्फोटासारखा आवाज आला अन् तिकोणेंचं घर गायब झालं, असं प्रत्यक्षदर्शी अक्षय भोसले सांगतो.