सध्या देशात मोठ्या घडामोडी घडत असून केंद्र सरकारने दहशतवादाविरोधात मोठा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार , केंद्रीय गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या अधिसूचनेनुसार, पाकिस्तानातील 23 व्यक्तींना बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंधक) कायदा (UAPA) अंतर्गत 'दहशतवादी' म्हणून घोषित करण्यात आले आहे. या सर्वांचा UAPA च्या चौथ्या अनुसूचीत समावेश करण्यात आला असून, त्यापैकी अनेक जण जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयब्बा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे.
या दहशतवाद्यांमध्ये मसूद इलियास काश्मिरी, मोहम्मद मुसादिक, मुफ्ती मोहम्मद असगर कान आणि हाफिज अब्दुल शकूर ही नाव हिट लिस्टवर आहेत. 2016 मध्ये नगरोटा येथील भारतीय लष्करी शिबिरावर हल्ला आणि 2022 मध्ये जम्मूतील सुंजवां येथील सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ल्यात त्यांचा सहभाग उघड झाला आहे. यासह इतरांवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. लष्कर-ए-तैयब्बाचा अब्दुल रऊफ आणि हाफिज खालिद वलीद हे दोघेही कुख्यात हाफिज मोहम्मद सईदचे विश्वासू सहकारी आहेत.
मोहम्मद शहीद फैसल उर्फ उस्ताद उर्फ जाकिर हे नाव अनेकांसाठी नवीन आहे. कारण तो मुळचा भारतीय आहे. बंगळुरू येथे तो राहत होता. सध्या तो पाकिस्तानातील रावळपिंडीमध्ये राहतो. त्याने पाकिस्तानी नागरिकत्व स्वीकारल्याची माहिती आहे. तो लष्कर-ए-तैयब्बा, अल-कायदा आणि ISIS या सर्व दहशतवादी संघटनांचा दुवा मानल्या जातो. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादासाठी तरुणांची भरती करणे, त्यांना शस्त्रांचं प्रशिक्षण देणे. दहशतवादी कारवाया करणे. या दहशतवादी कारवायांसाठी जगभरातून पैसा जमा करणे हे उस्तादचे काम आहे.
गृहमंत्रालयाने एक अधिसूचना प्रसिद्ध करत या दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. पाक पंतप्रधान शहबाज शरीफ, फील्ड मार्शल आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना हा झटका मानला जात आहे. ऑपरेशन सिंदूरपासून भारताची दहशतवादाविरोधातील धडक कारवाई पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरत आहे. झिरो टॉलरन्स धोरणात आता 23 दहशतवाद्यांची नाव जाहीर करत भारताने मोठी खेळी खेळली आहे.