आता आषाढी यात्रेत अन्नाच्या गुणवत्तेवर लक्ष; तुकाराम मुंढेंना पालकमंत्र्यांचा फोन
आता आषाढी यात्रेत अन्नाच्या गुणवत्तेवर लक्ष; तुकाराम मुंढेंना पालकमंत्र्यांचा फोन
img
Nandini khandare More
राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईमुळे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. भेसळयुक्त आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या त्यांच्या मोहिमेचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. दरम्यान, आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक पार पडली.दरम्यान,  या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयकुमार गोरे यांनी तुकाराम मुंढेंचा उल्लेख केला. आपण तुकाराम मुंडे यांच्याशी बोलणार असून आषाढी यात्रेत भाविकांना चांगले अन्नपदार्थ मिळावेत, अशा सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यात्रेच्या तयारीमध्ये पालखी मार्ग आणि पंढरपूर शहरात आषाढी यात्रा कालावधीमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांना चांगले आणि स्वच्छ अन्नपदार्थ मिळावेत यासाठी अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आले आहेत. याबाबत मी तुकाराम मुंढेंना बोलणार आहे, असे देखील गोरेंनी म्हटले. दरम्यान, कालच बुलढाण्यातली शेगाव येथे अन्न व औषध विभागाच्या पथकाने धाड टाकून मंदिर परिसरातील पेढ्याच्या दुकानातून नमुने जप्त केले आहेत.

आषाढी यात्रा काळात भाविकांच्या सुविधेसाठी परिवहन विभागाने 5000 एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या असून यावर्षी चांगल्यात चांगली सुविधा देण्याची कबुली परिवहन विभागाने दिल्याचे गोरे यांनी सांगितले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज या पालखी मार्गाची नव्याने निर्मिती झाल्यामुळे अनेक निवाऱ्याची झाडे रस्त्याच्या कामात पाडण्यात आली होती. यावर्षी जिल्हा परिषदेच्या कडून 10 हजार झाडे पालखी मार्गावर लावण्याचा निर्णय झाल्याची माहिती गोरे यांनी दिली. 

पाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र 
जयकुमार गोरेंनी आज पंढरपुरात येऊन पालखी मार्गासह चंद्रभागा वाळवंट, 65 एकर परिसरसह सर्व भागांची पाहणी केली. या पाहणीनंतर चंद्रभागेत पाणी सोडण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले जाणार असल्याचे गोरे यांनी सांगितले. आषाढी वारीमध्ये लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. मात्र, यंदा अलनिनोचे संकट असल्यामुळे पाण्यावर जरी निर्बंध असले. तरी वारकऱ्यांच्या सुविधेसाठी चंद्रभागा अर्थात भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहोत. जेणेकरून लाखो वारकरी भक्तांची व्यवस्था होईल. राज्यात जरी पाणीटंचाई असली तरी पालखी मार्गावर पाण्याची कमतरता नाही, असेही जयकुमार गोरे यांनी म्हटले. 

पंढरपुरात पावसाचे आगमन
पंढरपुरात आज मेघराजाने दर्शन दिले असून दुपापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसाने अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेला बळीराजा मात्र सुखावलेला आहे. या मान्सूनमध्ये पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावली असून सकाळपासूनच पाऊस पडेल असा अंदाज होता. त्यानुसार दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. तर, विठ्ठल मंदिर परिसरात काही काळ भाविकांची मोठी तारांबळ उडाली होती.
इतर बातम्या
Join Whatsapp Group