उद्धव ठाकरे गटातील ६ खासदारांच्या फुटीनंतर राज्यातील राजकरणात मोठं वादळ निर्माण झालं असून राजकरणातील घडामोडींना आता वेग आला आहे. सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. आज त्यांच्या यवतमाळ दौऱ्याआधी ते माध्यमांसमोर व्यक्त झाले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान ते मुख्यमंत्री फडणवीसांसोबतच्या विमानावरील प्रवासाबद्दलही बोलले. या पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत तसेच इतर नेतेही उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे यांच्या एकाच विमानातील प्रवासाबाबत विचारताच ते हसले आणि गमतीत म्हणाले, “त्यांच्यात आणि माझ्यात उच्च दर्जाची चर्चा झाली.”
नागपूर येथे पोहोचताच कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी ते म्हणाले, “दोन चार गद्दार फोडल्यानं शिवसेना संपत नसते. विरोधकांच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपवू शकणार नाहीत,” यावरून आधीच त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं. आता त्यांनी पत्रकार परिषदेतूनही विरोधकांवर थेट हल्लाबोल केला.