अजब ! चक्क नवी कोरी एसटी बस गेली चोरीला, कुठे घडली ही घटना?
अजब ! चक्क नवी कोरी एसटी बस गेली चोरीला, कुठे घडली ही घटना?
img
Nandini khandare More
 चोरी चपाटीच्या अनेक घटना घडतात, ऐकायला येतात. छोट्या चोरींपासून ते जबरी चोरीपर्यंत अनेक घटना आपण ऐकल्या आहेत. परंतु आता अशी एक चोरीची घटना घडली आहे जी अजब आणि विचित्रच आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील जामनेर आगारातून चक्क महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची नवी कोरी बसच चोरांनी चोरून नेल्याची धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. या अजब चोरीच्या प्रकारामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात आणि एसटी महामंडळात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या जामनेर आगारात उभी असलेली एक नवी कोरी एसटी बस मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शिताफीने पळवून नेली. ऐन मध्यरात्री बस चोरीला गेल्याची माहिती समोर आल्यानंतर आगार प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. चोरट्यांनी आगारातून बस नेली कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पंचरमुळे चोरट्यांचा प्लॅन फसला बस चोरून पळून जाणाऱ्या चोरट्यांचा हा प्रयत्न मात्र अपयशी ठरला आहे. पळवून नेलेली ही बस जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळ पोहचली असता, तिचे एक चाक पंचर झाले. अचानक चाक पंचर झाल्यामुळे चोरट्यांची तारांबळ उडाली आणि पुढे जाणे अशक्य झाल्याने ते बस रस्त्याच्या कडेला सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

ग्रामस्थांची मोठी गर्दी, सुरक्षेचा गंभीर प्रश्न आज सकाळी शहापूर गावाजवळ रस्त्याच्या कडेला सोडून दिलेली ही लालपरी (एसटी बस) पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीच्या वेळी थेट आगारातूनच बस चोरीला गेल्यामुळे जामनेर एसटी आगारातील सुरक्षेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून सध्या याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group