सोशल मोडियावर ओळख ! विमानाने आला नराधम, अल्पवयीन मुलीला लॉजवर भेटायला बोलवलं अन...
सोशल मोडियावर ओळख ! विमानाने आला नराधम, अल्पवयीन मुलीला लॉजवर भेटायला बोलवलं अन...
img
Nandini khandare More
आजकाल गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण तरुणी यांची ओळख आणि त्यातून होणारे मोठे कांड  अशा घटना वारंवार घडत असून आता अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरएका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची ओळख  एका बड्या बापाच्या मुलाशी झाली. पीडित तरुणी नागपूरची रहिवासी असून ती ठाण्यातील एका मुलाच्या संपर्कात आली होती. मागील काही दिवसांपासून दोघंही सोशल मीडियावरून संपर्कात होते. ही ओळख ठेवणं मुलीच्या चांगलंच अंगलट आलं आहे. आरोपी तरुणाने तिला भेटायला बोलवून लॉजवर तब्बल ३० तास डांबून ठेवलं होतं. एवढंच नव्हे तर त्याने ३० तासात मुलीच्या अंगावर चाकुने तब्बल २० वार केले होते. तसेच तिच्यावर आरोपीनं अमानुष अत्याचार केल्याचं देखील बोललं जातंय.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ही अल्पवयीन मुलगी आरोपी निर्भय उर्फ आकाश माधव पाखरे (वय २०, रा. घोडबंदर रोड, हिरानंदानी इस्टेट, पाटीलपाडा, ठाणे) याच्या संपर्कात आली होती. आरोपीने सुरुवातीला स्वतःचे बनावट नाव 'आकाश मेहरा' असल्याचे सांगून तिच्याशी ओळख वाढवली. हळूहळू संवाद वाढल्यानंतर आरोपीने मुलीला धमकावून तिचे अश्लील फोटो पाठवायला भाग पाडलं.

रविवारी आरोपी ठाण्याहून विमानाने नागपुरात आला. त्याने नागपुरातील दिघोरी परिसरात एक रुम भाड्याने घेतली. रविवारी सकाळी त्याने मुलीला तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची थेट धमकी दिली आणि तिला भेटायला येण्यास भाग पाडलं. मुलगी घाबरून भेटायला आल्यावर आरोपी दुपारी तिला रुमवर घेऊन गेला.

तब्बल ३० तास चाललेल्या या भयंकर प्रकारात आरोपीने मुलीचे हातपाय बांधले आणि तिच्या तोंडाला रुमाल बांधला, जेणेकरून ती मदतीसाठी ओरडू शकणार नाही. यानंतर अमानुषपणे तिची छळवणूक करत तिच्या शरीरावर चाकूने २० वार केले. गंभीर दुखापतींमुळे ती मुलगी असह्य वेदनेनं तडफडत होती.

हुडकेश्वर पोलिसांची कारवाई आणि असा लागला सुगावा
रविवारी रात्री उशिरापर्यंत मुलगी नातेवाईकांच्या संपर्कात होती, मात्र अचानक तिचा मोबाईल बंद झाल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मुलीच्या वडिलांनी तत्काळ हुडकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून अपहरणाचा गुन्हा दाखल करून वेगाने तपास सुरू केला.

चौकशीदरम्यान मुलगी 'आकाश' नावाच्या युवकाच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आलं. वडिलांनी पोलिसांना सांगितले की, काही दिवसांपूर्वी आरोपीने एका लँडलाईन क्रमांकावरून फोन करून त्यांनाही धमकी दिली होती. पोलिसांनी त्या लँडलाईन क्रमांकाच्या आधारे तपास चक्र फिरवून आधी आरोपीच्या आईशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांना आरोपीच्या दुसऱ्या मोबाईल क्रमांकाचा धागा मिळाला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.

ज्यावेळी पोलीस आरोपीला पकडण्यासाठी लॉजवर गेले, त्यावेळी आरोपीनं पीडितेच्या गळ्याला चाकू लावल्याचं देखील बोललं जात आहे. सध्या या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहरासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. यातील पीडित मुलगी ही एका बड्या अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती आहे. तर आरोपी हा ठाण्यातील एका व्यवसायिकाचा मुलगा असल्याचं सांगण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group