प्रसिद्ध तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसिद्ध लाडू प्रसादाच्या तुपातील कथित भेसळ प्रकरणाने पुन्हा एकदा देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई करत तूप पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक केली आहे. तिरुपती लाडू तयार करण्यासाठी निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त तूप पुरवल्याचा आरोप संबंधित कंपनीवर करण्यात आला आहे.
दरम्यान आता या अटकेमुळे आता या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार आणि मोठ्या साखळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
ईडीने तूप बनवणाऱ्या कंपनीचे मालक कैलाश चंद मंगला यांना मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. शुक्रवारी झालेल्या या कारवाईनंतर ईडीने सांगितले की, तिरुपती लाडू प्रसाद बनवण्यासाठी वापरण्यात येणारे तूप रिफाइंड पाम तेल, पामोलिन आणि विविध रसायनांपासून बनवले जात होते. तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) तूप भेसळ प्रकरणी हैदराबाद येथील ईडी कार्यालयाने सुकृती फूड्सचे कैलाश चंद मंगला यांना १७ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले. एजन्सीने सांगितले की, कैलाश चंद मंगलाला विशाखापट्टणम येथील मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
तुपाऐवजी या तेलांचा वापर तिरुपती लाडू प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे भेसळयुक्त तूप हे रिफाइंड पाम तेल, पाम कर्नल तेल, पामोलिन आणि एमजी-९०, मोनोग्लिसराइड्स, मायव्हेसिट सॉफ्ट ४०० व ऍसिटिक ऍसिड एस्टर यांसारख्या विविध रसायनांचा वापर करून तयार करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याचा दावा ईडीने केला आहे. ते टीटीडीला पुरवण्यासाठी 'अॅगमार्क स्पेशल ग्रेड गाईचे तूप' म्हणून खपवण्यात आले, असेही ईडीने म्हटलेय.
९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप २०१९-२०२४ दरम्यान टीटीडीला पुरवलेल्या अशा तुपाचे मूल्य २३० कोटी रुपये होते आणि यापैकी ९६ कोटी रुपयांचे भेसळयुक्त तूप मंगलाने तयार केले होते असा दावा ईडीने केला आहे. एजन्सीने म्हटले आहे की, मंगला या प्रकरणातील सह-आरोपींपैकी एक होता. त्याने भेसळयुक्त पदार्थ मिळवण्यास मदत केली आणि त्याच्या कारखान्यात भेसळयुक्त तूप तयार केले. "त्याने श्री वैष्णवी डेअरी स्पेशालिटीज, मालगंगा मिल्क अँड ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि ए. आर. डेअरी फूड्स यांसारख्या विविध शेल कंपन्यांमार्फत भेसळयुक्त तुपाच्या पुरवठ्याचे समन्वयही साधले," असे ईडीने म्हटले आहे..