फेरफार नोंदीत अनियमितता; तीन तलाठ्यांचे निलंबन !
फेरफार नोंदीत अनियमितता; तीन तलाठ्यांचे निलंबन !
img
Nandini khandare More

इगतपुरी तालुक्यातील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या दफ्तरांची तपासणी करण्यात आली असून फेरफार नोंदी आणि महसूल कामकाजात अनियमितता असलेल्या तलाठ्यांवर मोठी कारवाई झाली आहे. महसूल विभागातील तीन तलाठ्यांचे निलंबन झाले असून दोघांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे.

 प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या तपासणीदरम्यान मुकणे, वाडीवऱ्हे, मुंढेगाव, सांजेगाव आणि गोंदे दुमाला येथील महसूल कामकाजात विविध अनियमितता आढळून आल्या. फेरफार नोंदी करताना संबंधितांना आवश्यक नोटिसा न बजावता कार्यवाही पूर्ण करणे, अधिकारक्षेत्राबाहेर जाऊन फेरफार नोंदी घेणे, आवश्यक कागदपत्रांची तपासणी न करणे, तसेच खातेदार आणि हितसंबंधित व्यक्तींना नोटीस न देता फेरफार नोंदीची प्रक्रिया पूर्ण करणे, अशा गंभीर त्रुटी तपासणीत निदर्शनास आल्या.

मंडळ अधिकाऱ्यावरही ठपका

वाडीवऱ्हेचे मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांच्या दफ्तर तपासणीत अधिनस्त तलाठ्यांच्या कामकाजावर आवश्यक नियंत्रण नसल्याचे आढळून आले. तसेच ई-ऑफिसद्वारे नामंजूर झालेल्या फेरफार नोंदींमध्ये संबंधित तलाठ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात कसूर झाल्याचेही तपासणीत समोर आले. या पार्श्वभूमीवर मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

तीन तलाठी निलंबित

प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तीन तलाठ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यापैकी एका तलाठ्याविरोधात विभागीय चौकशीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. तर उर्वरित दोन तलाठ्यांसह मंडळ अधिकारी बबन कोकाटे यांची प्रत्येकी एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारवाई झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे

बबन कोकाटे — मंडळ अधिकारी, वाडीवऱ्हे नितीन केदार — तलाठी, वाडीवऱ्हे सोमनाथ सांगळे — तलाठी, गोंदे दुमाला समीक्षा देव — तलाठी, सांजेगाव मनोज वाकदकर— तलाठी, मुंढेगाव पुष्कराज निकम— तलाठी, मुकणे

महसूल कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर आता अधिक लक्ष

फेरफार नोंदींच्या कामकाजातील अनियमिततेवर थेट कारवाई झाल्याने इगतपुरी तालुक्यातील महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर प्रशासनाकडून अधिक काटेकोर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच तहसीलदार कार्यालयातील दफ्तराचीही अचानक तपासणी होणार असल्याने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये सतर्कता वाढली आहे. महसूल नोंदींच्या कामकाजात नियमांचे पालन आणि पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने या कारवाईकडे पाहिले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group