केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारणे एका दुचाकीस्वाराला महागात पडले आहे. कारण या कट मारणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला एका दुचाकीने कट मारल्याची घटना पुण्यातील संचेती चौकात घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वारावर बेदरकारपणे गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या कार्यक्रमादरम्यान मंत्र्यांचा ताफा गर्दीत अडकल्यामुळे स्थानिक नागरिक आणि भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
नेमकी काय घडली घटना? मिळालेल्या माहितीनुसार, १३ सप्टेंबरच्या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा ताफा संचेती चौकातून जात होता. त्यावेळी त्यांच्या अंगरक्षक कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक ईश्वर भिकुले यांच्या तक्रारीनुसार, शुभम विजय वनित (वय ३२, रा. नानापेठ) या दुचाकीस्वाराने ताफ्यातील वाहनाला वेडीवाकडी गाडी चालवून कट मारला. मानवी जिवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन चालवल्यामुळे १४ सप्टेंबर रोजी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २८१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काठे करत आहेत.