नाशिकच्या कथित ढोंगी बाबा अशोक खरात प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातचे पाय आणखी खोलात गेले आहेत. या प्रकरणातील मनी लाँड्रिंगच्या गंभीर गुन्ह्यात मुंबईच्या विशेष न्यायालयाने अशोक खरातसह त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध प्रथमदर्शनी भक्कम पुरावे असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष न्यायालयाच्या या आदेशामुळे आता खरातसह सर्व आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, सर्वांना आगामी २२ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोर्टाच्या आणि ईडीच्या रेकॉर्डवर नोंदवलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा पॅटर्न अत्यंत थक्क करणारा आहे. आरोपींनी गुन्हेगारी कृत्यांतून आणि जबरदस्तीने कमावलेल्या काळ्या पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावर संपत्ती खरेदी करण्यासाठी केला. हा कोणताही एकच गुन्हा नसून, एकाच पद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केल्याचे प्रकार समोर आले आहे.
तपासात उघड झाले की, या ढोंगी बाबाने शिर्डी परिसरातील एका गरीब शेतकऱ्याला त्याच्या जमिनीची बाजारात असणाऱ्या प्रत्यक्ष किंमतीपेक्षा अत्यंत कवडीमोल भावाने जमीन विकण्यास प्रवृत्त केले होते. अंधश्रद्धा आणि भीतीचा फायदा घेत तक्रारदारांकडून तब्बल ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम उकळल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून म्हणजेच २० मे पासून खरात तुरुंगात असून, त्याच्या काळ्या उद्योगांची पाळेमुळे आता खणून काढली जात आहेत.
ईडीची धडक कारवाई आणि न्यायालयात हजर राहण्याचे आदेश ईडीने या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेत मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत सखोल तपास सुरू केला. खरातविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या मूळ एफआयआरमध्ये फसवणूक, बळजबरी वसूली, चुकीच्या पद्धतीने ओलीस ठेवणे आणि धमकी देण्यासारख्या गंभीर कलमांचा समावेश होता. यात महाराष्ट्राच्या अंधश्रद्धा विरोधी कायद्याच्या कठोर कलमांचीही भर घालण्यात आली होती
या संपूर्ण रॅकेटमध्ये अशोक खरात याच्यासोबतच त्याची पत्नी कल्पना खरात, अरविंद बावके, नामकरण आवारे, अविनाश कांडेक आणि मिलिंद बंकर हे इतर पाच आरोपीही सामील असल्याचे तपासात स्पष्ट झाले. या सर्व साथीदारांनी खोटा दस्तऐवज तयार करणे आणि बनावट संपत्तीचे व्यवहार पार पाडण्यासाठी मदत केल्याचा दावा ईडीने केला आहे. न्यायालयाच्या नव्या आदेशानुसार, या सर्व ६ जणांना २२ सप्टेंबर रोजी विशेष न्यायालयाच्या दारात हजर राहावे लागणार आहे.