गणेशोत्सवासोतबच सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने आता डीजेबंदी, लाऊडस्पीकरवरील बंदीची चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात लाऊडस्पीकर तसेच डीजे, ढोल-ताशांवरील बंदीची मागणी जोर धरू लागली आहे. असे असतानाच आता नागपूरमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.
नेमका निर्णय काय घेण्यात आला?
समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार नागपुरात आजपासून म्हणजेच 3 सप्टेंबर रोजीपासून एक नोव्हेंबरपर्यंत डीजेवर बंदी घालण्यात आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. नागपुरात आज रात्रीपासून ते 1 नोव्हेंबरपर्यंत डिजे, डिजेचे वाहन, डिम लाईट, लेजर लाईटवर बंदी असेल. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल. नागपूर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या या आदेशामुळे मिरवणुकीत डॉल्बी साऊंड सिस्टम वापरावर निर्बंध आले आहेत.
पुण्यात नेमकी काय मागणी केली जात आहे?
पुण्यात डीजे, डॉल्बी, ढोल-ताशे यावर बंदी घालावी अशी मागणी केली जात आहे. विद्यानंद बापट या सामान्य नागरिकाने याबाबत आवाज उठवला आहे. पुण्याच्या महापालिका बैठकीत त्यांनी जाहीरपणे डीजेवर बंदी घालावी अशी मागणी घातल्यानंतर हा मुद्दा आता पुण्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.