दुर्दैवी ! दहीहंडीची लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू
दुर्दैवी ! दहीहंडीची लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा मृत्यू
img
Nandini khandare More
राज्यातील अनेक शहरात दहिहंडीचा उत्साह साजरा होत आहे.  पुण्यातील जुन्या सांगवीतून एक दुर्दैवी घटना बातमी समोर येत आहे. पिंपरी चिंचवडच्या जुन्या सांगवीत दहीहंडी उत्सवासाठी उभारलेली लोखंडी कमान अंगावर पडून ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सलमा सलाउद्दीन पठाण असं मृत महिलेचं नाव आहे.

रात्री विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी संपल्यानंतर लोखंडी सांगाडा काढण्याचं काम सुरू होतं. यावेळी अचानक लोखंडी भाग सलमा यांच्या डोक्यावर पडला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, मृत महिलेचा मुलगा मंडळात असल्याने कुटुंबियांनी मंडळाविरोधात तक्रार देण्यास नकार दिला आहे. इतर मुलं अडचणीत येऊ नयेत, अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली असून पोलिसांनी स्वत:हून गुन्हा दाखल करू नये, अशीही विनंती करण्यात आली आहे. या घटनेनं जुन्या सांगवी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 
नेमकं घडलं काय?

प्राप्त माहितीनुसार, जुन्या सांगवी परिसरात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास विघ्नहर्ता मंडळाची दहीहंडी उत्साहात पार पडली. हा उत्सव झाल्यानंतर गर्दी पांगली. अनेक जणांनी घराचा मार्ग धरला. उत्सव संपल्यानंतर मंडप आणि लोखंडी सांगाडा काढण्याचे काम सुरू होतं. त्यावेळी सलमा पठाण या पतीसोबत घटनास्थळी उभ्या होत्या. लोखंडी सांगाडा काढण्याचे काम सुरू असतानाच अचानक लोखंडी बाग त्यांच्या डोक्यावर कोसळला. त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group