मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आला की, समोरून नेमकं कोण बोलतंय, असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकदा हे कॉल फसवणुकीचेही ठरतात. मात्र, आता अशा अनोळखी कॉल्सची ओळख पटवणं अधिक सोपं होणार आहे. कारण १ नोव्हेंबरपासून कॉलिंगसंदर्भात मोठा बदल होण्याची चर्चा आहे.पण ही सुविधा नेमकी कशी काम करणार? कोणत्या मोबाईल ग्राहकांना याचा फायदा मिळणार? आणि निनावी कॉल्सना खरोखरच आळा बसणार का? जाणून घेऊया सविस्तर.
मोबाईल युझर्सला येत्या 1 नोव्हेंबरपासून स्पॅम, बनावट आणि फसव्या कॉल्सपासून दिलासा मिळेल. आता मोबाईलची रिंग वाजताच निनावी फोन असला तरी नंबर ऐवजी कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव धिसले. दूरसंचार कंपनींच्या नवीन धोरणानुसार, नोंदवलेले अधिकृत नाव थेट झळकणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) कॉलिंग नेम प्रेझेंटेशन ही नवीन सेवा 1 नोव्हेंबरपासून अनिवार्य केली आहे. पण या सेवाचा एक फटकाही बसणार आहे. ज्यांनी त्यांच्या मित्राचे, मैत्रिणाचे मोबाईलमधील नाव मुद्दाम चुकीचे लिहिले आहे, त्यांचे पितळ उघडे पडण्याची शक्यता आहे.
सध्या मोबाईल युझर्सला अनोळखी क्रमांकावरून कॉल आल्यास त्याची ओळख पटवण्यासाठी ट्रू कॉलर वा तत्सम थर्ड पार्टी ॲप्सचा सर्रास वापर करण्यात येतो. पण हे ॲप्स युझर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर आधारीत नाव दाखवतात अथवा चुकीचे नाव दाखवतात. निनावी क्रमांकासाठी हे ॲप भरवशाचे नाहीत. विशेष म्हणजे ते कॉन्टॅक्ट लिस्टचा डेटा चोरण्याची भीती असते.
आता काय होणार?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, CNAP अंतर्गत जेव्हा तुम्हाला कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून कॉल येईल. तेव्हा कॉलरचे नाव हे त्याच्या केवायसी प्रक्रियेनुसार तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. त्यासाठी ग्राहकांना आता थर्ड पार्टी ॲप्स डाऊनलोड करण्याची गरज उरणार नाही.
या निर्णयाचा युझर्सला मोठा फायदा
या सुविधेमुळे आता सायबर गुन्हेगार अथवा फेक कॉल करणारे लागलीच समोर येतील. आता फसवेगिरी करणाऱ्यांचे पितळ उघडे पडेल. अशा लोकांना ओळखणे सोपे होईल. त्यांच्याविषयी तक्रारही दाखल करता येईल. बँकिंग आणि विविध फसव्या योजनांची माहिती देऊन दिशाभूल करणारे, फसवणूक करणारे उघड होतील. क्रेडिट कार्ड, कर्ज आणि टेलिमार्केटिंग कॉल्सपासून सुटका होण्यासाठी या सुविधाचा मोठा वापर होईल.
या नवीन फीचरमुळे स्कॅम आणि स्पॅम कॉलची लागलीच ओळख होईल. नागरिकांची फसवणूक रोखणे आणि डिजिटल सुरक्षा वाढवण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. ही सेवाची सुरुवात 4G आणि 5G त्यावर आधारीत नेटवर्कवर सुरु होईल. यामुळे सामान्यांची खोट्या कॉलपासून सुटका होईल. त्यांना थर्ड पार्टी ॲप्सची गरज भासणार नाही.
आता कसं होणार?
विशेष म्हणजे हे फीचर आपोआप सुरू होईल. यामुळे लफडेबाजांचे धाबे दणाणणार आहे. कारण मोबाईलवर कुणाचा कॉल आला, त्या व्यक्तीचे नाव दिसेल. अनेकांनी वेगवेगळ्या नावांनी मोबाईलमध्ये नावं सेव्ह केलेले असते. पण आता स्क्रीनवर खरं नाव समोर येईल. परिणामी चोरी पकडली जाईल. लपवाछपवी करता येणार नाही.