नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):- रेल्वेची सिग्नल यंत्रणा तोडून गाडी थांबवत त्यामध्ये दरोडा टाकल्याच्या २०१८ मधील गुन्ह्यात आठ वर्षांपासून फरार असलेल्या प्रमुख संशयिताला नाशिक रोड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. नितीन ऊर्फ सोन्या सुरेश काळे (रा. आरोळी वस्ती, जामखेड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी त्याला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या तपासासाठी अटक केली. आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या गुन्ह्यातील प्रमुख संशयिताला अटक झाल्याने रेल्वे पोलिसांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली आहे. कसबे सुकाणे येथे २०१८ मध्ये रेल्वेची सिग्नल यंत्रणा तोडून गाडी थांबवून त्यात दरोडा टाकण्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यात पाच ते सहा संशयितांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले होते. त्यापैकी इतर संशयितांना अटक करण्यात आली होती; मात्र नितीन काळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो मिळून येत नसल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय दंड प्रक्रिया संहितेच्या कलम २९९ नुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
आठ वर्षांपासून फरार असलेल्या संशयिताचा शोध सुरू असताना नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्यातील सहायक फौजदार संतोष उफाडे यांनी बातमीदारामार्फत माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून संशयिताला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला संबंधित गुन्ह्याच्या तपासासाठी अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वसंत भोये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. नाशिक रोड रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी सचिन बनकर, आरपीएफचे पोलीस निरीक्षक नवीन प्रताप सिंग, सहायक फौजदार संतोष उफाडे, पीएसआय राजेंद्र सोनवणे, सहायक फौजदार राजेश बागुल, पोलीस हवालदार शैलेंद्र पाटील, सचिन दैवे, आरपीएफचे सागर वर्मा आणि एमएसएफचे राहुल चौधरी यांनी या कारवाईत सहभाग घेतला.