सणासुदीच्या सुट्टीत विमानाने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या बजेटवर अतिरिक्त भार पडू शकतो.देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने विमान तिकिटांवरील इंधन शुल्कात मोठी वाढ जाहीर केली असून, ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून नवीन तिकीट बुकिंगसाठी सुधारित दर लागू होणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागले आहे. परिणामी, विमान इंधनाच्याकिमतीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून दर गेल्या दशकातील सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. या वाढत्या इंधन खर्चाचा थेट फटका विमान कंपन्यांना बसत असल्याने इंडिगोने हा निर्णय घेतला आहे.
देशांतर्गत प्रवासासाठी विमानाने पार केलेल्या अंतरानुसार अतिरिक्त इंधन शुल्क आकारले जाईल. यात प्रवासाच्या टप्प्यांनुसार १०० रुपयांपासून ते ३५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, कमी अंतराच्या प्रवासासाठी १०० रुपये तर दूरच्या अंतरासाठी प्रवाशांना ३५० रुपयांपर्यंत जास्त मोजावे लागतील.
इंडिगोने आंतरराष्ट्रीय विमानांच्या सरचार्जमध्ये बदल केले आहेत आणि हे दर विविध क्षेत्रांनुसार वेगवेगळे आहेत. सार्क (SAARC) क्षेत्रातील विमानांसाठीचे शुल्क १,००० रुपयांवरून ३,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे, तर युरोपला जाणाऱ्या विमानांसाठी इंधन शुल्क १०,००० रुपये निश्चित करण्यात आले आहे.
भारतातील देशातंर्गत विमान सेवा बाजारपेठेत इंडिगोचा वाटा हा ६० टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे या दरवाढीमुळे अनेक प्रवासी रेल्वे प्रवासाच्या पर्यायाकडे वळण्याची शक्यता आहे.