पश्चिम बंगालच्या राजकारणातून आणि भाजपच्या गोटातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापुरात कालीपूजेच्या दरम्यान भाजप नेत्याची मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्याम कुमार दास उर्फ सायन असे हत्या झालेल्या भाजप नेत्याचे नाव आहे. बुधवारी रात्री फरीदपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार , या प्रकरणी पोलिसांनी विजय नंदी आणि प्रसून पांडे या दोघांना अटक केली आहे. गुरुवारी त्यांना दुर्गापूर कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने दोघांनाही चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणातील आणखी एक संशयित अजय याचा पोलिस शोध घेत आहेत.
दरम्यान गुरुवारी मुख्यमंत्री सुवेंधु अधिकारी हे बांकुरा दौऱ्यावर जात असताना अंडाल विमानतळावर पोहोचले. यावेळी पांडवेश्वरचे आमदार जितेंद्र तिवारी यांच्यासह भाजपच्या इतर आमदारांनी त्यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मृत सायन यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. तसेच सायन यांच्या पत्नीने नोकरी करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांना राज्य सरकारमध्ये कंत्राटी तत्वावर नोकरी देण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.
स्थानिकांच्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून विजय नंदी, त्याचा भाऊ अजय आणि त्यांचा साथीदार प्रसून पांडे यांच्यासोबत सायन यांचा गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सायन यांचा मित्र रंजन याने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री मूर्ती विसर्जन करून परतत असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रंजयच्या हातालाही दुखापत झाली. याचदरम्यान सायन घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी काही तरुणांनी लोखंडी रॉड घेऊन त्यांचा पाठलाग केला. या हल्ल्यात सायन गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सायन हे पांडवेश्वर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या तीन नंबर मंडळाच्या ओबीसी मोर्चाचे महासचिव होते. त्यांच्या वडिलांनी, परिमल दास यांनी फरिदपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच या हत्येत सहभागी असलेले सर्वजण तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, या आरोपांची अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.