Nashik : बेझे धरणात बुडून वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू; भाऊबीजेच्या दिवशी दुर्घटना
Nashik : बेझे धरणात बुडून वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू; भाऊबीजेच्या दिवशी दुर्घटना
img
चंद्रशेखर गोसावी

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अंजनेरी शिवारातील बेझे धरणात अंघोळीसाठी गेलेल्या वडिलांसह त्यांच्या दोन मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भाऊबीजेच्या दिवशी घडली. मृतांमध्ये सात वर्षांच्या चिमुकलीचाही समावेश आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी शिवारात असलेल्या बेझे धरण परिसरात राहणारे उत्तम चव्हाण यांच्याकडे दिवाळीनिमित्त सुरेश नामदेव भोर (वय ४२), ज्योती सुरेश भोर (वय १०) आणि हर्षदा सुरेश भोर (वय ७, तिघेही रा. वाघेरे) पाहुणे म्हणून आले होते.

बुधवारी म्हणजेच आज भाऊबीजेच्या दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास हे तिघे बेझे धरणात अंघोळीसाठी गेले होते. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने ते एकापाठोपाठ एक पाण्यात बुडू लागले. या दुर्घटनेत तिघांचाही बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदारांसह अन्य वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तिघांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. सकाळी सुमारे अकराच्या सुमारास शोध पथकाला तिघांचेही मृतदेह आढळून आले.

त्यानंतर तिघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group