निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना मोठा धक्का; TCS प्रकरणात सहआरोपी
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना मोठा धक्का; TCS प्रकरणात सहआरोपी
img
Nandini khandare More
नाशिक मधील TCS प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ निर्माण केली होती. दरम्यान आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ​टीसीएस कंपनीतील  महिला कर्मचाऱ्याच्या धर्मांतराचा प्रयत्न व बलात्कार प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला पसार असताना आश्रय दिल्याचा ठपका ठेवत एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व माजी खासदार इम्तियाज जलील  यांना नाशिक शहर पोलिसांच्या  गुन्हे शाखेने सहसंशयित केले आहे. ६ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी गुन्हा नाेंद केला असून, पुढील तपासासाठी नाशिक पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगरात दाखल झाले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात  दाखल या गुन्ह्यात निदा खान पसार असताना तिला एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल व घरमालक हनिफ शेख यांनी राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती. यापूर्वीच मतीन व हनिफ या दोघांवर सहसंशयित म्हणून कारवाई करण्यात आली आहे. तथापि, मतीन व हनिफ यांच्या चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. इम्तियाज जलील यांच्या सांगण्यावरूनच मतीनने निदा खान आणि तिच्या नातलगांना एका खोलीत राहण्यास मदत केली होती, असे तपासात व तांत्रिक विश्लेषणातून समाेर आले आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये, विशेष तपास पथकाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी जलील यांचे नाव या गुन्ह्यात सहसंशयित म्हणून समाविष्ट केले आहे. नाशिक पोलिसांचे (Nashik Police) विशेष पथक आता छत्रपती संभाजीनगर येथे तपासाची चक्रे वेगाने फिरवत असून, या प्रकरणात जलील यांची प्रत्यक्ष काय भूमिका होती आणि त्यांना चौकशीसाठी कधी समन्स बजावले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. नाशिक बातम्या

​टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दानिश शेख या मुख्य संशयितावर बलात्काराचा ठपका असून तौसिफ अत्तारवर विनयभंगाचा आरोप आहे. तर, निदा खानसह दानिश व तौसिफवर पीडितेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर ठपका आहे. सध्या मुख्य संशयित दानिश शेख हा कारागृहात असून, इतर सर्व संशयितांना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group