नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सिडकोतील पाटीलनगर येथील राजीव गांधी मार्केटमध्ये असलेल्या श्रीराम रबडीवाला यांच्या दुकानात सीताफळाच्या पल्पमध्ये अळ्या आढळल्याने त्यांचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फुड, सेफ महाराष्ट्र’ मोहीम राबविली आहे. त्याअंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार नाशिकचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने आणि ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्ननमुन्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात सिडकोतील पाटीलनगर येथील राजीव गांधी मार्केटमधील मे. श्रीराम रबडीवाला या दुकानात सीताफळ रबडीमध्ये अळ्या आढळल्या. यासह अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे व संकेत येलमामे यांनी केलेल्या तपासणीत स्वच्छता व अन्नसुरक्षाविषयक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे परिशिष्ट-4 चे उल्लंघन झाले असून, या आस्थापनेचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभाग नागरिकांच्या आरोग्याच्या संरक्षणास सर्वोच्च प्राधान्य देत असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्या कोणत्याही अन्न व्यावसायिकास सवलत दिली जाणार नाही. यापुढेही अशी मोहीम चालूच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना अन्नपदार्थांबाबत कोणतीही शंका आल्यास अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक विभागाचे सहआयुक्त मंगेश माने यांच्या वतीने करण्यात आले आहे.