नाशिकमध्ये खड्ड्यांमूळे आणखी एक बळी !
नाशिकमध्ये खड्ड्यांमूळे आणखी एक बळी !
img
Nandini khandare More

सातपूर - आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अंबड लिंक रोड परिसरात विविध विकासकामांसाठी सुरू असलेले खोदकाम आणि त्यातून निर्माण झालेले जीवघेणे खड्डे आता नागरिकांच्या जिवावर उठले आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या भीषण अपघातात सुनील दादाजी बोरसे (वय ५२), रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, बोलकर व्हॅली पोलीस चौकीजवळ, अशोकनगर) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
       
सुनील बोरसे हे रंग कामासाठी सकाळच्या सुमारास दुचाकीवरून प्रवास करीत होते. अंबड लिंक रोडवरील  रस्त्यावर खड्ड्यात त्यांची दुचाकी आदळली. या धक्क्याने दुचाकीच्या पाठीमागे बसलेले बोरसे वाहनांवरून खाली पडले. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या वाहनाच्या चाकाखाली ते सापडल्याने त्यांचा मृत्यू झाला. अवघ्या काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

रंगकाम करून कुटुंबाचा सांभाळ
सुनील बोरसे हे रंगकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, विधवा आई आणि विधवा बहीण असा परिवार आहे. कुटुंबाची आर्थिक जबाबदारी मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावरच होती. त्यामुळे त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधारच हिरावला आहे
खड्डे की मृत्यूचे सापळे?

अंबड लिंक रोडवरील खड्डे दिवसेंदिवस अपघातांचे केंद्र बनत आहे. 
या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने दुचाकीस्वार, कामगार, विद्यार्थी आणि नागरिक ये-जा करतात. खड्डे चुकविताना दुचाकीस्वारांचा तोल जाण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. यापूर्वीही या मार्गावर खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वार घसरून जखमी झाले आहे 

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही; मात्र कामे सुरू असताना वाहतूक सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची आहे. रस्त्यावरील खोदकामामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास पर्यायी मार्ग, योग्य दिशादर्शक फलक, बॅरिकेड्स आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था करणे आवश्यक आहे.सुनील बोरसे यांच्या मृत्यूने अंबड लिंक रोडवरील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group