तांदळाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तांदळाच्या निर्यातीवर थेट २० टक्के शुल्क लावण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. या निर्णयामागे देशांतर्गत बाजारात तांदळाचा पुरवठा वाढवून किमती नियंत्रणात ठेवण्याचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, हा प्रस्ताव लागू झाल्यास तांदळाच्या बाजारपेठेत नेमके काय बदल होणार? तांदूळ स्वस्त होणार की ग्राहकांच्या खिशावर वेगळाच परिणाम होणार? जाणून घेऊया सविस्तर...
दाळ, साखर, तांदळासह इतर पदार्थांच्या किंमतीमध्येही वारंवार वाढ होत आहे. भारत सरकारने खाद्यपदार्थाचे दर नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. तांदळाच्या किंमती आवक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने खास जातींच्या तांदळाच्या निर्यातीवर शुल्क लावण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
केंद्र सरकार देशांतर्गत साठा वाढवण्यासाठी तांदळाच्या काही खास जातींच्या निर्यातीवर २० टक्के निर्यात शुल्क लावण्याचा विचार करत आहे. कणी (तुकडा तांदूळ) आणि काही महागड्या नॉन-बासमती तांदळाच्या प्रकारांवर हे शुल्क लागू होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. या निर्णयामुळे तांदळाची निर्यात परदेशात महाग होण्याची शक्यता आहे. पण देशातील ग्राहकांना आणि पोल्ट्री व पशुखाद्य उद्योगांना वाढत्या किमतींपासून दिलासा मिळू शकेल.
एक्सपोर्ट ड्यूटी वाढवण्याचा निर्णय का घेतला? रॉयटर्सच्या वृत्तानुसार, देशातील काही राज्यात तांदळाच्या काही खास जातींच्या किंमतीत अचानक वाढ झाली. दक्षिणेतील काही राज्यात प्रीमियम नॉन-बासमती तांदळाचा पुरवठा कमी आहे. त्याशिवाय तुकडा तांदळाच्या किंमती वाढल्यामुळे पोल्ट्री, कुक्कुटपालन, पशुखाद्य उद्योगांना मोठा फटका बसला. त्यामुळे तांदळाचा अधिक साठा परदेशात निर्यात करण्याऐवजी देशांतर्गत बाजारात उपलब्ध राहावा म्हणून सरकारने पावले उचलली आहेत. स्थानिक व्यवसाय, उद्योग आणि ग्राहकांना वाढत्या किमतींपासून दिलासा मिळेल.
निर्यातीवर काय परिणाम होईल? सरकारने २० टक्के कर लावला, तर भारतीय तांदूळ परदेशात पाठवणे महाग होईल आणि त्यामुळे निर्यातीचा वेग काहीसा मंदावू शकतो. मात्र, भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश असून आपले दर इतर देशांच्या तुलनेत स्वस्त आहेत, त्यामुळे ही निर्यात पूर्णपणे थांबणार नाही. दरम्यान, भारताच्या या निर्णयाचा फायदा थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार यांसारख्या देशांना होऊ शकतो; कारण भारतीय तांदूळ स्वस्त असल्याने या देशांना जागतिक बाजारात स्पर्धा करणे कठीण जात होते.