कुटुंबातील एका छोट्याशा गोष्टीवरून मोठा वाद निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. सात वर्षांच्या मुलाचे त्याच्या आईने केस कापल्याने आजोबा प्रचंड संतापले. इतकंच नाही, तर त्यांनी थेट सुनेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र, मुलाचे केस कापण्यावरून आजोबांनी पोलिसांत धाव घेण्यामागचं नेमकं कारण काय? या प्रकरणात पुढे काय घडलं? जाणून घेऊया...
मिळालेल्या माहितीनुसार, एका शीख कुटुंबातील मुलाचे केस कापल्याने दोन कुटुंबामध्ये मोठा वाद निर्माण झाल्याची धक्कादायक घटना हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात घडली आहे. हा वाद एवढा वाढला की मुलाच्या आजोबांनी आपल्याच सुनेविरोधात पोलिसांत धाव घेतली. तसेच शीख धर्मात केसांना धार्मिक ओळख आणि आस्थेशी जोडून पाहिले जात असतानाही सुनेने तिच्या मुलाचे केस जाणीवपूर्वक कापले, असा आरोप केला.
मिळालेल्या माहितीनुसार सदर वृद्ध आजोबांनी २१ नोव्हेंबर रोजी मंडी येथील सदर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल केली. त्यांनी याबाबत पोलिसांना सांगितले की, माझा ७ वर्षांचा नातू शहरातील एका खाजगी शाळेत शिकतो. त्याचे केस त्याच्या आईने जाणीवपूर्वक कापले. ही बाबत शीख धर्मातील प्रथा आणि परंपरेच्या विरोधात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
या आजोबांनी सांगितले की, शीख धर्मामध्ये केस न कापणे हा धार्मिक आस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे नातवाचे केस कापल्याने आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी आपल्या सुनेविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही या वृद्धाने केली आहे. तसेच असा प्रकार पुन्हा घटता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी सदर महिलेविरोधात भादंवि कलम २९९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आता पोलिस या प्रकरणी सर्व पैलूंचा तपास करत आहेत. तसेच संबंधित पक्षांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. तसेच या प्रकरणी अधिक तपास केला जात आहे.