मुंबई, पुणे, नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रातील रिक्षाचालकांच्या आंदोलनाची चर्चा सुरू झाली आहे. बाईक टॅक्सी सेवांना दिलेली परवानगी आणि रिक्षाचालकांच्या विविध मागण्यांवरून हा वाद पेटला आहे. त्यामुळे आज राज्यातील रिक्षा सेवा बंद राहणार का? प्रवाशांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार का? रिक्षाचालकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? जाणून घ्या सविस्तर…
राज्यभरातील बाईक टॅक्सी कायमस्वरूपी बंद करावी आणि त्यासंबंधीचे धोरण रद्द करावे, या मागणीसाठी आज रिक्षा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात रिक्षा बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये रिक्षाचालक थेट लोकप्रतिनिधींच्या कार्यालयावर धडक देणार आहेत. नाशिक, मुंबईमध्येही रिक्षा चालकाचा बंद असणार आहे.
नेमके आंदोलन कुठे आणि कसे होणार? पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा पंचायतीने या आंदोलनाची माहिती दिली आहे. आज सकाळी ११ वाजता परिवहन राज्यमंत्री तथा पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ आणि पिंपरीचे आमदार तथा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर रिक्षाचालक जोरदार निदर्शने करणार आहेत. या निदर्शनांच्या काळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिली आहे. या आंदोलनात रिक्षा पंचायतसह आझाद रिक्षा संघटना आणि छावा वाहन चालक कामगार संघही सहभागी होणार आहेत.
मुंबईसह राज्यभरात बंदचा इशारा दुसरीकडे, कोणतीही अधिकृत परवानगी नसताना रॅपिडो (Rapido) सारख्या कंपन्यांच्या माध्यमातून शहरात बेकायदेशीरपणे दुचाकीवरून प्रवासी वाहतूक सुरू असल्याचा आरोप रिक्षा संघटनांनी केला आहे. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज राज्यभरातील सर्वच रिक्षा संघटनांनी 'रिक्षा बंद'ची हाक दिली आहे. तसेच, संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हाधिकारी आणि परिवहन आयुक्तांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती संजय नाईक यांनी दिली आहे.
रिक्षा चालकांचा विरोध नेमका कशाला? रिक्षा चालकांना विमा, योग्यता प्रमाणपत्र (Fitness), ठराविक भाडे दर, गणवेश अशा अनेक सरकारी नियमांचे पालन करावे लागते. मात्र, कोणतीही जबाबदारी नसलेल्या खाजगी दुचाकींमुळे रिक्षा चालकांच्या आधीच कमी झालेल्या उत्पन्नात (अर्ध्या भाकरीत) वाटेकरी निर्माण होत आहेत, असे संघटनांचे म्हणणे आहे. यापूर्वी २०२२ मध्ये रिक्षा पंचायतीने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर सरकारने नेमलेल्या माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अभ्यास समितीनेही महानगरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देऊ नये, केवळ दुर्गम भागातच परवानगी द्यावी, अशी स्पष्ट शिफारस केली होती. झा समितीने विरोध करूनही राज्य सरकार पुन्हा एकदा महानगरांमध्ये बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या तयारीत असल्याने रिक्षा चालकांमध्ये तीव्र संताप आहे. हे धोरण पूर्णपणे रद्द करून बाईक टॅक्सी हद्दपार करावी, अशी आग्रही मागणी आजच्या आंदोलनातून केली जाणार आहे.