नाशिकच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदावरून सुरू असलेला राजकीय सस्पेन्स अखेर संपला असून, १० स्वीकृत नगरसेवकांची नावे समोर आली आहेत. विशेष म्हणजे, या नियुक्त्यांमध्ये भाजपने सर्वाधिक सहा जागांवर आपले वर्चस्व राखले आहे.
न्यायालयीन लढाईचे सावट, पक्षांतर्गत मतभेद आणि नियुक्ती प्रक्रियेतील विलंब अशा अनेक घडामोडींनंतर आज (दि. २०) दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा करण्यात आली. महापौर हिमगौरी आडके-आहेर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोन वाजता आयोजित महासभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. शहर शोधा
महासभेच्या सुरुवातीला दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सभेपुढील पहिलाच प्रस्ताव स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मांडण्यात आला. नगरसचिव संजय नेरकर यांनी यासंदर्भातील डॉकेट सभागृहात वाचून दाखवले. विभागीय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी झालेल्या पक्ष आणि आघाड्यांच्या अधिकृत गटनेत्यांकडून प्राप्त झालेल्या नावांची छाननी व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसाठी हा प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्यात आला होता. महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नावांची घोषणा केली.
यामध्ये भाजपचे सहा, शिवसेना-मनसे शहर विकास आघाडीचे दोन, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस शहर विकास आघाडीचे दोन सदस्यांचा समावेश आहे. त्यानुसार भाजपकडून अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांची नियुक्ती करण्यात आली. शिवसेना-मनसे आघाडीकडून विनायक आढाव आणि चंद्रकांत लवटे यांना संधी मिळाली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे-काँग्रेस आघाडीकडून हेमंत गायकवाड आणि बाबासाहेब गायकवाड यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.
दरम्यान, नियुक्तीची घोषणा होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तसेच उपस्थित नगरसेवकांनी नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले. यावेळी महापौर हिमगौरी आडके-आहेर, महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी नवनियुक्त स्वीकृत नगरसेवकांना व्यासपीठावर बोलावून त्यांचे अभिनंदन करत सत्कार केला.