कथित गोरक्षकांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण खपवून घेणार नाही; तक्रार करा, कारवाई करू : डॉ. प्रवीण तोगडिया
कथित गोरक्षकांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण खपवून घेणार नाही; तक्रार करा, कारवाई करू : डॉ. प्रवीण तोगडिया
img
Chandrakant Barve

 नाशिक कुंभमेळ्यासाठी १० हजार डॉक्टर देण्याची तयारी...

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- गोरक्षणाच्या नावाखाली काही कथित गोरक्षकांकडून शेतकऱ्यांची वाहने अडविणे, त्यांच्यावर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणणे तसेच आर्थिक शोषण करण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी गंभीर आहेत. अशा प्रकारांना अजिबात खपवून घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कथित गोरक्षकांची तक्रार आमच्याकडे करा, प्राप्त तक्रारींची शहानिशा करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय बजरंग दलाचे प्रमुख डॉ. प्रवीण तोगडिया यांनी दिले. गोरक्षण ही स्वागतार्ह बाब असली तरी त्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यात आरोग्यसेवेसाठी गरज भासल्यास १० हजार डॉक्टर उपलब्ध करून देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या डॉ. तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भूमिका मांडली. यावेळी नगरसेवक कैलास मुदलियार, शिवसेना नेते विजय करंजकर, मोहन चौहान, नितीन चिडे, विनय उपाध्याय, लकी ढोकणे आदी उपस्थित होते.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना चारा आणि पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पशुधन सांभाळणे कठीण झाल्याने अनेक शेतकरी आपल्याकडील जनावरे विक्रीस प्राधान्य देत आहेत. मात्र, अशा वेळी काही कथित गोरक्षक शेतकऱ्यांची वाहने अडवून ते पशुधन कत्तलीसाठी नेत असल्याचा आरोप करतात. पोलिसांना संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास भाग पाडण्याचे प्रकार घडत आहेत. याशिवाय, अशा कथित गोरक्षकांकडून आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण होत असल्याची बाब पत्रकारांनी डॉ. तोगडिया यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावर प्रतिक्रिया देताना, आमचे गोरक्षक अशा हेतूने काम करणार नाहीत, असे स्पष्ट करत त्यांनी अशा प्रकारांची तक्रार करण्याचे आवाहन केले. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधितांची शहानिशा करून योग्य ती कारवाई.करण्याची भूमिका त्यांनी मांडली.

नाशिक कुंभमेळ्यासाठी १० हजार डॉक्टर देणार...

आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. तोगडिया यांनी आरोग्यसेवेसाठी १० हजार डॉक्टर उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यंदा दहा पट अधिक भाविक येण्याची शक्यता असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे गर्दीचे योग्य नियोजन, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि अफवा रोखणे या बाबींना विशेष महत्त्व द्यावे लागेल. भाविकांना कमीत कमी चालावे लागेल, अशा पद्धतीने नियोजन केल्यास गर्दीचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईल, असेही ते म्हणाले.

नाशिक कुंभमेळ्याची माहिती घेणार असून, आरोग्यसेवेबरोबरच अन्नदानासाठीही योगदान देण्याची आमची इच्छा आहे. गरज भासल्यास दहा हजार डॉक्टर देण्याची आमची तयारी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हनुमान चालीसा केंद्रांतून आरोग्यसेवेचा संकल्प...

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्रयागराज कुंभमेळ्यापासून हनुमान चालीसा सप्ताहाचा उपक्रम सुरू केला. देशातील लाखो गावांमध्ये हनुमान चालीसा पठण केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांचे केवळ धार्मिक उपक्रमांपुरते मर्यादित स्वरूप न ठेवता त्यांचे आरोग्य केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे.

सुमारे २५ कोटी लोकांपर्यंत आरोग्यविषयक व्यवस्था पोहोचविण्याचा संकल्प असून, आतापर्यंत दहा हजार डॉक्टरांना या अभियानाशी जोडण्यात आले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि हाडांचे आजार यांसारख्या समस्या वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे नियंत्रणात आणता येतात. कर्करोगाच्या बाबतीतही वेळेवर तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचे आहेत. आपण कर्करोगतज्ज्ञ असून योग्य वेळी उपाययोजना केल्यास दहापैकी आठ रुग्णांना कर्करोगापासून वाचविणे शक्य असल्याचा दावा त्यांनी केला.

शेतकरी आत्महत्या ही शरमेची बाब..

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना डॉ. तोगडिया म्हणाले, शेतकरी आत्महत्या करतो, ही समाजासाठी शरमेची बाब आहे. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असून आजही शेतात घास कापतो. माझ्याकडे अडीचशे गायी आहेत. महाराष्ट्र सरकारने देशातील विविध राज्यांतून, विशेषतः मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणावर चारा खरेदी करून शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला द्यावा. शेतकऱ्यांना केवळ पाच हजार रुपयांची मदत देण्याऐवजी शक्य तितकी जास्त आर्थिक मदत थेट रोख स्वरूपात द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सरकार गरिबांना अन्नधान्य देत आहे, हे चांगले काम आहे. मात्र, समाज म्हणून आपलेही गरिबांना मदत करण्याचे कर्तव्य आहे. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेमार्फत एक कोटी गरीब कुटुंबांना धान्य उपलब्ध करून देण्याचा मानस असून, प्रत्येक हिंदू घर समृद्ध, सुरक्षित आणि आरोग्यसंपन्न व्हावे, हे अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणुकीपुरते पक्ष, अन्य वेळी हिंदू म्हणून संबंध

राजकीय विषयावर भाष्य करताना त्यांनी भाजपसह विविध पक्षांतील नेत्यांशी असलेल्या संबंधांबाबत भूमिका स्पष्ट केली. निवडणुकीच्या काळात पक्ष महत्त्वाचा असतो; मात्र इतर वेळी हिंदू म्हणून आपले संबंध महत्त्वाचे असतात. माझे सर्व हिंदूंशी संबंध आहेत. भाजपशी दूरचे संबंध असते तर गिरीश महाजन यांच्याशी बोललो नसतो. शिंदे शिवसेना अस्तित्वात येण्यापूर्वीही मी त्यांच्या घरी जात होतो. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणी बोलावले तरी त्यांच्या घरी जाईन. मात्र, भेटीनंतर त्यांच्यावर हिंदुत्वाचा अधिक मोठा शिक्का बसेल, असे ते म्हणाले.

सत्ता येण्यात आमचाही हातभार असतो; मात्र त्याबाबत आम्ही बोलत नाही. सध्या जे आहे त्यात मी समाधानी असून सत्ता येते आणि जाते, असे सांगत त्यांनी दीर्घकालीन यशाला अधिक महत्त्व असल्याचे नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आपले सहकारी भाऊ संबोधत, नरेंद्र मोदी यांच्या वडिलांवर आपण कर्करोगाचे उपचार केले होते, असा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनाचा अधिकार, मात्र हिंसा नको...

लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार असून, समाजातील प्रश्नांसाठी आंदोलन आवश्यक आहे. मात्र, आंदोलनाला हिंसक वळण लागता कामा नये. फ्रान्समध्ये तरुण नागरिक आपला आवाज उठवतात, त्याचप्रमाणे भारतातील तरुणांनीही प्रश्नांवर आवाज उठवावा; परंतु हिंसक मार्गाचा अवलंब करू नये, असे आवाहन त्यांनी केले. २०२९ मध्ये राजकीय चित्र काय असेल, याचा ज्योतिषशास्त्रीय अभ्यास आपण केलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्रिशूळ वाटपाची जबाबदारी माझीच...

त्रिशूळ वाटपाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी त्रिशूळ आपणच वाटले होते, असे स्पष्ट केले. डॉक्टर असूनही पैसे कमावण्यापेक्षा सामाजिक आणि धार्मिक कार्याला प्राधान्य दिले. त्रिशूळ बनविण्याचा आपला कारखाना असून देवीचे शस्त्र त्रिशूळ आहे. ते प्रवीण तोगडिया वाटणार नाहीत तर कोण वाटणार, असा सवाल त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंह आणि महाराणा प्रताप हे आपले आदर्श असल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group