७ ऑक्टोबर २०२६
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- पेठ तालुक्यातील सावळ घाटात खासगी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले असून, 6 प्रवासी जखमी झाले आहेत.शिर्डीहून राजकोटकडे खासगी बस 22 प्रवासी घेऊन जात होती. काल रात्री 11 वाजेच्या सुमारास ही बस पेठ तालुक्यातील करंजाळीजवळ असलेल्या सावळ घाटात पोहोचली असता बसचालकाला वळणाचा अंदाज न आल्याने बस पलटी झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसर्या प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राहुल ओझा व महेंद्र पाल अशी मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे असून, प्रमिला राऊत, यश देसाई, आरती देसाई, बालविमल जगदीश, नयन वासोने, स्वाती सुरेश बडाणे व सुरेश बडाणे हे प्रवासी जखमी झाले आहेत.अपघाताची माहिती मिळताच ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय नाशिक, नामको चॅरिटेबल ट्रस्ट व आडगाव नाका येथून एकूण 4 रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना झाल्या. जखमींवर सुरुवातीला दिंडोरी उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कर्जाचे हप्ते महागणार ! व्याजदरात वाढ, रेपो दरात आरबीआयने केली वाढ
अपघाताची माहिती मिळताच पेठचे उपविभागीय पोलीस अधिकारी, कळवणचे उपविभागीय पोलीस अधिकारी, दोन पोलीस निरीक्षक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने बसमधील सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.हा अपघात धुक्यामुळे निर्माण झालेल्या कमी दृश्यमानतेमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. पुढील तपास सुरु आहे.
Copyright ©2026 Bhramar