येवला :- येवला आणि मनमाड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या अनकाई परिसरातील रेल्वे पुलाजवळ आज भीषण अपघात घडला. यात दोघांचा मृत्यू झाला असून, जवळपास 10 प्रवासी जखमी झाले आहेत.
श्रीरामपूर येथून काही प्रवासी झायलो कारने आपल्या पाहुण्यांना उत्तर प्रदेश येथे सोडण्यासाठी निघाले होते. दरम्यान, अनकाई रेल्वे पुलाजवळ या झायलो कारची आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली.
हा अपघात इतका भीषण होता की, कारचेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघातात 28 वर्षीय तरुण आणि 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, या अपघातामध्ये 8 ते 10 प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
जखमींना तत्काळ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यातील काही जखमींवर येवला उपजिल्हा रुग्णालयात, तर काहींवर मनमाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघात नेमका कसा झाला, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरु होते. काही जखमी प्रवाशांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे हलविण्यात आल्याचे समजते.