तळीरामांना मोठा झटका ! ''या'' जिल्ह्यांमध्ये  ड्राय डे ; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?
तळीरामांना मोठा झटका ! ''या'' जिल्ह्यांमध्ये ड्राय डे ; किती तारखेपर्यंत बंद असणार दारूची दुकानं?
img
Nandini khandare More
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांमध्ये मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. काही  जिल्ह्यांतील संबंधित भागांमध्ये ड्राय डे लागू करण्यात आल्याचं वृत्त आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवार २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. निवडणुकांचा प्रचार थांबला असून आज संध्याकाळपासून दारूबंदी लागू होणार आहे. शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पुणे जिल्ह्यातील संबंधित गावांमध्ये आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.

पुण्यासह ज्या जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहेत, त्या ठिकाणीही ड्राय डे असणार आहे. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र निश्चित केलेल्या गावांतील आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिलेत. ज्या गावांमध्ये आठवडे बाजार बंद राहणार आहेत, त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मौजे पारगाव तर्फे असवसरी बुद्रुक व घेडेगाव, इंदापूर तालुक्यातील मौजे बावडा, खेड तालुक्यातील मौजे राजगुरुनगर आणि बारामती तालुक्यातील मौजे लोणीभापकर या गावांचा समावेश आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित गावांतील व्यापारी, बाजार समित्या, ग्रामपंचायती आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागपुरात तीन दिवस ड्राय डे नागपूर पदवीधर मतदारसंघातर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व दारूचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. 21 ऑक्टोबर म्हणजे आज सांयकाळी चार वाजेपासून ते 23 ऑक्टोबर सायंकाळी 4वाजेपर्यंत नागपूर पदवीधर मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय डे असणार आहे. या काळात दारूची सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला असून सर्व मद्यविक्रेत्यांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. त्यामुळे या दोन दिवसांच्या काळात या भागांमध्ये पूर्णपणे ड्राय डे असणार आहे. अमरावतीत कधी असेन ड्राय डे कालावधी: २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४:०० वाजल्यापासून ते २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत हा नियम लागू राहील. या काळात अमरावती जिल्ह्यातील सर्व वाईन्स शॉप्स, बिअर शॉप्स, बार आणि परमिट रूम्स पूर्णपणे बंद राहतील. राज्यात पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. ज्यामध्ये दोन शिक्षक तर तीन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी पाच जागेसाठी एकूण 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. येत्या 23 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 27 ऑक्टोबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान या निवडणुकांसाठी पाच मतदारसंघात मिळून मतदानासाठी एकूण 2 हजार 419 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलीय.

इतर बातम्या
Join Whatsapp Group