एक अत्यंत भीषण घटनेची वार्ता समोर आली आहे. शाळेचे छत कोसळून २९ विद्यार्थी आणि एका महिला शिक्षिकेचा मृत्यू झाला. पाकिस्तानातील पेशावर शहरातील ही घटना आहे. या दुर्घटनेत ४० हून अधिक जण जखमी झाले आहे. पेशावरमधील दिर कॉलनी परिसरात ही दुर्घटना घडली. शहराचे पोलीस प्रमुख मियाँ सईद यांनी या घटनेची माहिती दिली. दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळच्या सुमारास शाळेत चालू वर्गामध्ये शाळेचे छत कोसळले. या दुर्घटनेत वर्गातील विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकले. या ढिगाऱ्याखालून आतापर्यंत २९ मृतदेह काढण्यात यश आले असून अजूनही बचाव पथकाकडून बचावकार्य सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान २९ मृतदेहांमध्ये एका महिला शिक्षिकेचा मृतदेह सापडला आहे. तसेच इतर ४० जण जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था करण्यात आली आहे. बचाव पथकांनी २५ जखमी मुलांना उपचारासाठी दाखल केले.
छत कोसळल्यानंतर ढिगाऱ्याखाली आणखी विद्यार्थी किंवा शाळेतील कर्मचारी अडकले असण्याची शक्यता लक्षात घेऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. बचाव पथके ढिगारा हटवून अडकलेल्या विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबीयांप्रति हळहळ व्यक्त केली.