गेल्या काही महिन्यांपासून मध्यपूर्वेत तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संबंध अधिकच ताणले गेले असून याचा झळा संपूर्ण जगाला सोसाव्या लागत आहेत.याच पार्श्वभूमीवर आता अमेरिका पुढील आठवड्यात इराणविरोधात मोठ्या लष्करी कारवाईच्या तयारीत असल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू झाली आहे.
अमेरिका पुढील आठवड्यात इराणवर पुन्हा मोठ्या लष्करी कारवाईची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित वृत्तपत्र द न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हणजेच पेंटागॉनने विविध हल्ल्यांचे पर्याय तयार केले असून अंतिम निर्णय आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी सांगितले की आवश्यकता भासल्यास लष्करी कारवाई अधिक तीव्र करण्याची संपूर्ण योजना तयार ठेवण्यात आली आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, संभाव्य हल्ल्यांमध्ये इराणच्या लष्करी तळांबरोबरच महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले करण्याचा पर्यायही समाविष्ट आहे.
याशिवाय अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन फोर्सेसना थेट इराणमध्ये उतरवून इस्फहान येथील अणुस्थळामध्ये साठवलेले समृद्ध युरेनियम ताब्यात घेण्याचा एक धोकादायक पर्यायही चर्चेत आहे. मात्र अमेरिकन अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे की अशी मोहीम अत्यंत जोखमीची ठरू शकते आणि त्यात मोठ्या प्रमाणावर सैनिकी हानी होण्याची शक्यता आहे.
अहवालानुसार अमेरिकेने सध्या मध्य-पूर्व भागात 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. याशिवाय दोन एअरक्राफ्ट कॅरियर, डझनभर नौदल विध्वंसक जहाजे आणि मोठ्या प्रमाणावर लढाऊ विमाने या भागात सक्रिय आहेत. सुमारे 5 हजार मरीन सैनिक आणि 82व्या एअरबोर्न डिव्हिजनचे 2 हजार पॅराट्रूपर्सही पुढील आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगितले जात आहे.