इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाला वेठीस धरले आहे. याचदरम्यान आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेने एका देशावर एअर स्ट्राईक केला असल्याची माहिती आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावरुन परत येताच अमेरिकेने एका देशावर एअर स्ट्राईक केला आहे. या स्ट्राइकमध्ये जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी मारला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे कि, अमेरिकन आणि नायजेरियन सैन्याने एकत्र येत एका मोठ्या दहशतवादविरोधी मोहिमेला यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेत SIS चा दुसरा सर्वात मोठा कमांडर अबू-बिलाल अल-मिनुकी याला ठार करण्यात आले. ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती दिली. हे ऑपरेशन अत्यंत कठीण होते आणि संपूर्ण नियोजनासह पार पाडले गेले, असे ट्रम्प यांनी सांगितले. अबू-बिलाल अल-मिनुकी आफ्रिकेत लपून दहशतवादी कारवाया चालवत होता आणि जगभरातील ISIS च्या ऑपरेशन्समध्ये त्याची मोठी भूमिका होती, असेही त्यांनी नमूद केले.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मते, अल-मिनुकीला वाटायचे की तो आफ्रिकेत लपून सुरक्षित राहू शकतो, परंतु अमेरिकन संस्थांकडे त्याच्या प्रत्येक हालचालींची सातत्याने माहिती होती. “आता तो आफ्रिकेतील लोकांना घाबरवू शकणार नाही किंवा अमेरिकनांविरुद्ध हल्ल्यांचे कट रचू शकणार नाही,” असे ट्रम्प म्हणाले. या कारवाईमुळे ISIS च्या जागतिक नेटवर्कला आणि त्यांच्या ऑपरेशन्सना मोठा धक्का बसल्याचेही त्यांनी सांगितले. या मोहिमेत सहकार्य केल्याबद्दल त्यांनी नायजेरिया सरकार आणि तेथील सैन्याचे आभार मानले. आपल्या निवेदनाच्या शेवटी त्यांनी ‘गॉड ब्लेस अमेरिका’ म्हणत अमेरिकन सैन्याचे कौतुक केले.