हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले ! अधिवेशनाची तारीख जाहीर
हिवाळी अधिवेशनाचे बिगुल वाजले ! अधिवेशनाची तारीख जाहीर
img
Nandini khandare More

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा घडामोडींना वेग येणार आहे. नागपुरात येत्या ७ डिसेंबरपासून राज्य  विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंबर कसली असून, विधानभवनासह संपूर्ण परिसरात तयारीला सुरुवात झाली आहे. सुरक्षा व्यवस्था, निवास, वाहतूक आणि इतर आवश्यक सुविधांचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार आणि विरोधक सरकारला कोणत्या प्रश्नांवर घेरणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अधिवेशनासाठी २५ नोव्हेंबरपासून अधिकारी-कर्मचाऱ्यांचे नागपुरात आगमन होणार आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उद्दिष्ट आहे. तयारीसाठी एकूण ३८६ कामे निश्चित करण्यात आली आहेत. २२९ कार्यालयीन इमारतींमध्ये तर १५७ निवासस्थानांमध्ये कार्यरत असणार आहेत. पण सुमारे १५० निविदा अद्याप खुल्या झालेल्या नाहीत. अनेक कामांचे कार्यादेशही जारी नसल्याने तयारीवर प्रश्नचिन्ह आहे. काही निविदांना कंत्राटदारांचा प्रतिसाद नसल्याने अडचणी वाढल्या. कार्यादेशापूर्वीच एजन्सी निश्चित झाल्याची चर्चा आहे. सर्व महत्त्वाची कामे सुरू असून २७ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, असा पीडब्ल्यूडीचा दावा आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group