जगभरातील लाखो मायक्रोसॉफ्ट युजर्सना अचानक मोठ्या तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. मायक्रोसॉफ्टच्या Outlook या लोकप्रिय ई-मेल सेवेतील बिघाडामुळे अनेक युजर्सना ई-मेल पाठवता येत नसून, आलेले मेल उघडण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे वैयक्तिक कामांसह अनेक कार्यालयीन कामांचाही खोळंबा झाला आहे.
मायक्रोसॉफ्टच्या महत्त्वाच्या सर्विसेस जागतिक स्तरावर ठप्प झाल्या आहेत. यामध्ये आऊटलुक सेवा डाऊन झाल्याने जगभरातील लाखो युजर्सना मोठा फटका बसला आहे. या तांत्रिक बिघाडामुळे युजर्सना ई-मेल पाठवण्यात, प्राप्त करण्यात आणि त्यांच्या इनबॉक्समध्ये प्रवेश मिळवण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक कार्यालये आणि व्यक्तींसाठी ई-मेल सेवा आवश्यक असल्याने, या आउटेजमुळे दैनंदिन कामांवर नकारात्मक परिणाम झाला आहे.
सेवा पूर्ववत करण्यासाठी मायक्रोसॉफ्टचे अभियंते आणि तांत्रिक कार्यसंघ वेगाने प्रयत्न करत आहेत. जगभरातील या तांत्रिक बिघाडानंतर काही निवडक भागांमध्ये आता अंशतः सुधारणा दिसू लागली आहे, ज्यामुळे तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे सूचित होते.
या तांत्रिक बिघाडासंदर्भात मायक्रोसॉफ्ट कंपनीने अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, या मोठ्या तांत्रिक बिघाडामागे कोणतीही घातपाती कारवाईचा पुरावा नाही. हा केवळ तांत्रिक कारणांमुळे झालेला बिघाड असल्याचे कंपनीने म्हटले आहे. युजर्सना लवकरात लवकर अखंडित सेवा मिळावी यासाठी कंपनी कटिबद्ध आहे. तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजनांवर कंपनी काम करत आहे.